आता चक्क शौचालयांतही भ्रष्टाचार ! वाचा सविस्तर वृत्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • पनवेल पालिका अधिकाऱ्यांचा प्रताप
  • लाभार्थ्यांना पुन्हा पैसेवाटप
  • लाभार्थ्यांची यादी मागितल्यावर  देण्यात टाळाटाळ

पनवेल : स्वछ भारत अभियानांतर्गत पालिका स्थापनेपूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयाकरिता तीन हजार ५९९ लाभार्थ्यांना अनुदानवाटप करण्यात आले; मात्र अनुदानाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा अनुदानवाटप करण्याचा प्रताप पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. याकरिता पाच ते सहा हजार रुपयांची लाच घेऊन अनुदानवाटपात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याची माहिती  हाती आली आहे.

पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांनी केवळ स्वतःच्या फायद्याकरिता जुन्या लाभार्थ्यांनी बांधलेल्या शौचालयांचे पुन्हा सर्वेक्षण करून पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानाचे वाटप करण्यात आल्याचे या प्रकरणातून पुढे आले आहे.

२०१६ मध्ये स्थापन झालेल्या पनवेल पालिकेतर्फे वैयक्तिक शौचालयाकरिता ३५९९ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांप्रमाणे जवळपास सात कोटी १९ लाख ८० हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे; मात्र हे अनुदान वाटप करताना पालिका स्थापनेअगोदर पंचायत समितीमार्फत शासनाने वैयक्तिक शौचालयाकरिता अनुदान दिलेल्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच ते १० हजार रुपयांचा मलिदा घेण्यात आला. तसेच एकाच कुटंबातील दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वैयक्तिक शौचालयाकरिता पालिकेचे अनुदान देण्याचा प्रताप करण्यात आला आहे.

असा केला प्रकार
अनुदान देण्यात आलेल्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून नव्याने अनुदान देण्यात आले आहे; तर काही ठिकाणी चाळीत राहणाऱ्या भाडेकरूंच्या कागदपत्रांचा वापर करूनही अनुदान देण्यात आल्याचे पालिकेकडून देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतून स्पष्ट झाले आहे.
 

वैयक्‍तिक शौचालयाच्या अनुदानवाटपात गैरव्यवहार झाला असल्‍यास त्‍याविषयी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. 

- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्‍त आयुक्‍त, पालिका

यादी देण्यास टाळाटाळ
वैयक्तिक शौचालयासाठी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी पत्यासहित मिळावी, यासाठी वारंवार मागणी करूनही पत्त्यासहित यादी देण्यात टाळाटाळ करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News