आता आणखी एक भगीरथ; कोण आहेत..? कोणी दिली उपाधी..? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • मी 2003 पासून या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यानंतर 16 वर्षे हा लढा दिला.
  • तत्कालिन मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याकडेही मागणी केली होती.
  • मंत्री चंद्रकात पाटील यांनी टेंभूचे पाणी माणमध्ये नेले. तेच खरे भगीरथ आहेत

सातारा : माणमधील 16 गावांना पाणी देण्यासाठी 2003 पासून लढा देत आहे. तत्कालिन मंत्री रामराजे नाईक- निंबाळकर यांच्याकडेही मागणी केली होती. पण, ती पूर्ण झाली नाही. त्यांच्यासह अधिकारी, यंत्रणांनी लवाद, अनुशेषाचा मुद्दा पुढे केला. मात्र, मंत्री चंद्रकात पाटील यांनी टेंभूचे पाणी माणमध्ये नेले. तेच खरे भगीरथ आहेत, अशी बाजू भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आज मांडली. त्यांनी आमदार जयकुमार गोरेंवर नौटंकी सुरू असल्याचा आरोपही केला. 

पत्रकार परिषदेत श्री. देसाई म्हणाले, "टेंभूचे पाणी माणमध्ये नेण्याची राजकीय इच्छाशक्‍ती भाजपा व चंद्रकांत पाटील यांनी दाखविली. आम्ही करायचे ते ठरविले आणि केलेही. म्हणूनच चंद्रकांतदादा हेच खरे भगीरथ आहेत. टेंभूचे पाणी माण, खटावला नेण्यासाठी माझ्यापूर्वीही माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी विधीमंडळात प्रश्‍न मांडला होता. 

मी 2003 पासून या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. त्यानंतर 16 वर्षे हा लढा दिला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे गत सप्टेंबरमध्ये माण दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन केले. त्यांच्यामुळेच माणमधील महाबळेश्‍वरवाडीच्या तलावात पाणी आणून 16 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला जात आहे.

आता जिहे- कठापूरमधून आंधळी तलावात पाणी आणून 32 गावांना पाणी उचलून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी आमदार चंद्रकात पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. भाजपमुळेच हे पाणीप्रश्‍न मागी लागत आहेत.'' 

श्री. देसाईंनी आमदार जकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. ते म्हणाले, "त्यांचे मुख्यमंत्री असताना, ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताइत असतानाही टेंभूच्या पाण्याची मागणी केली नाही. टेंभूचे पाणीच माणमध्ये येवू शकत नाही, असे म्हणणारे ते कथित "जलनायक" आहेत. 

आता पाणी येत असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी बैठका लावत आहेत. खासदारांचा पदर धरला आहे म्हणून मंत्री गिरीष महाजन यांनी मुंबईत बैठक लावली आहे. भाजप हे पाणी देणार असे दिसल्याने त्यांची नौटंकी सुरू आहेत. माणमध्ये पाणी आल्यानंतर त्यांनी बोटिंग करून "मस्ती" केली होती. पण, ते पाप आहे. आम्ही असली मस्ती करणार नाही.'' 

गोरे वाईट प्रवृत्ती 
जयकुमार गोरेंना भाजपमध्ये घेवू नये, असा ठराव करून भाजप कार्यकर्त्यांनी तो अध्यक्ष अमित शहांकडे पाठविला आहे. माणमध्ये "आमचं ठरलं" असून, चुकीच्या माणसासाठी आमचा विरोध आहे. गोरे ही वाईट प्रवृत्ती आहे. युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचा उमेदवाराला आमदार करू. पण, त्यांना नाही, अशी टिकाही श्री. देसाईंनी केली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News