'सारं काही पैश्यांवर विकत घेता येत नाही', प्रियांका गांधींचे भाजपला खडे बोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

कर्नाटकातील आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडण्यात आले ते पाहता ही घटना इतिहासातील काळा अध्याय ठरेल, भाजपने सगळे घटनात्मक संकेत धुडकावून लावत पैसा आणि ताकदीचा वापर करत हे सरकार पाडले आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

- मायावती, सर्वेसर्वा बसप

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर आता काँग्रेसश्रेष्ठींनीही भाजपवर निशाणा साधायला सुरवात केली आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वांत गलिच्छ घोडेबाजार यानिमित्ताने पाहायला मिळाला असून येथे अनैतिक मार्गाने राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे, याविरोधात काँग्रेस देशभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.

भाजपवर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा म्हणाल्या, की ‘‘एके दिवशी भाजपला नक्की समजेल, की सगळ्याच गोष्टी या पैशामध्ये खरेदी करता येत नाहीत, प्रत्येकाला धमकावले जाऊ शकत नाही आणि प्रत्येक असत्य हे शेवटी चव्हाट्यावर येतेच; पण तोपर्यंत देशातील जनतेला अमर्याद भ्रष्टाचार, घटनात्मक संस्थांचे नियोजनबद्ध खच्चीकरण सहन करावे लागते. जी लोकशाही अपार मेहनत आणि त्यागातून तयार झाली तीदेखील यामुळे कमकुवत होते.’’

अध्यक्षपदास प्रियांका यांचा नकार
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  सध्या पक्षाने सुपूर्द केलेली जबाबदारीच आपण सांभाळणार आहोत, त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आपले नाव पुढे केले जाऊ नये असे त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आता या पदासाठी गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News