उत्तर काशीमध्ये; ‘बेटी मारो अभियान’ जोरात सुरू आहे...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • तीन महिन्यांत एकाही मुलीचा जन्म नाही

उत्तरकाशी - केंद्र सरकार एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवत असताना हा उपदेश लोकांच्या डोक्‍यावरून जात आहे की काय, अशी परिस्थिती उत्तराखंडमध्ये निर्माण झाली आहे. येथील १३२ गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत मुलगी जन्मालाच आलेली नाही. स्रीभ्रुणहत्या हेच यामागील कारण असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

 सरकारी माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत २१६ बालकांचा जन्म झाला आहे. मात्र, हे सर्वच्या सर्व मुलगे असून यात एकही मुलगी नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही गावांमध्ये केवळ दोन ते तीनच मुली जन्माला आल्या आहेत. या मागील कारण शोधण्यासाठी लवकरच चौकशी केली जाईल, असे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. येथे ‘आशा’ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात त्यांना गैरप्रकार होत असल्यास त्याकडे लक्ष ठेवण्यास आणि त्याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले आहे. मात्र, स्रीभ्रुणहत्या हेच यामागील एकमेव कारण असून येथील लोकांची क्रूर मानसिकतेचा हा परिणाम असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. तसेच, हा प्रकार घडत असताही काहीही कारवाई होत नाही, हे प्रशासनाचेही अपयश असल्याचे स्पष्ट आहे, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News