रोजगार मागणारे नाही तर देणारे बना -प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

विद्यार्थ्यांनी रोजगार मागणारे नाही, तर रोजगार देणारे बनावे. आज सकल कुणबी समाज एक झाला आहे. समाजाने ताकद ओळखून जिवनाच्या सर्वांगीण क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा ध्यास घ्यावा.

चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी रोजगार मागणारे नाही, तर रोजगार देणारे बनावे. आज सकल कुणबी समाज एक झाला आहे. समाजाने ताकद ओळखून जिवनाच्या सर्वांगीण क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा ध्यास घ्यावा. राजकारण व समाजकारण या संविधानाने दिलेल्या दोन अंगाचा वापर करून स्वत:सोबतच समाजाचा उद्धार करावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी कले.

धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरच्या वतीने रविवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता धनोजे कुणबी समाज सभागृहात आयोजित केले सकल कुणबी समाज गुणवंत गौरव व सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड चंद्रपूरचे प्रवक्ता प्रा. दिलीप चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, तिरळे कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, खेडुले कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, झाडे कुणबी समाजाचे अध्यक्ष निलकांत तरोणे, बावणे कुणबी समाजाचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार, लेवा पाटील कुणबी समाजाचे अध्यक्ष डॉ. चुन्नीलाल अच्युत (ङ्केगडे), प्रा. व्ही. एम. येरगुडे, विनोद पिपळशेंडे उपस्थित होते.

प्रा. दिलीप चौधरी यांनी, समाजात नवा विचार करणारे, मांडणारे तरुण तयार झाले पाहिजेत. रिसर्च क्षेत्रात संधी आहेत. विद्याथ्र्यांनी येथे करिअर करून स्वत:चे आणि समाजाचे नावलौकीक करावे. पारंपरिक विचार बदलून नवीन क्षेत्रे प्रतिष्ठित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांत मराठा समाज अल्पसंख्यांक आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील कुणबी समाजाला शिक्षणात १३ आणि नोकरीत १२ टक्के आरक्षण देण्यात यावे. या मागणीच्या पूर्ततेसाठी कुणबी समाजातील सर्व पोटजातीने एकसंध होऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे मत अ‍ॅड. सातपुते यांनी व्यक्त केले.
 
यावेळी दहावी, बारावी, वाणिज्य शाखेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या गुणवंतांचा स्व. श्रीहरी जीवतोडे स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन, इतर गुणवंतांचा स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन, युपीएससीत उत्तीर्ण रणजित थिपे, एमपीएससीत अभिजीत ठाकरे, स्वप्नील राजूरकर, पूनम गेडाम, पीएच.डी. प्राप्त डॉ. अशोक जीवतोडे (दुस-यांदा), प्रा. विठ्ठलराव येरगुडे, डॉ. शुभांगी भोयर, डॉ. दामोदर गोवारदिपे, प्रा. नामदेव मोरे, डॉ. श्वेता रोडे, डॉ. योगेश ठावरी, उच्च विद्याविभूषित डॉ. पंकज लोनगाडगे, डॉ. प्रितेश गौरकार, कौस्तुभ गौरकार तसेच हितेश गोहोकार यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विनोद पिंपळशेंडे यांनी केले. संचालन केतन जुनघरे यांनी, तर आभार सचिव अतुल देऊळकर यांनी मानले.
 

वेबसाईटचे विमोचन
कुणबी समाजातील सर्व पोट जातीतील कर्तव्ययोग्य वधू-वरांची संपूर्ण माहिती असलेल्या वेबसाईटचे विमोचन करण्यात आले. यात वधू-वरांची वैयक्तिक माहिती, शिक्षण, व्यवसाय किंवा नौकरी, उत्पन्न, डॉक्यमेंट व्हेरीफिकेशन, जीवनशैली, वर-वधुंच्या कुटूंबांबद्दल व इतर माहिती असणार आहे. तरी सर्व कुणबी पोटजातीतील विवाह योग्य वर- वधुंनी www.kunbilagna.in या वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News