ईव्हीएमबाबत आता कोणाकडूनही आशा उरली नाही : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • ईव्हीएमबाबत राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण;
  • ममता बॅनर्जींशी सविस्तर चर्चा 
     

कोलकता/मुंबई : ईव्हीएमबाबत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणतीही आशा नाही, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलकत्यात व्यक्त केले. 

ईव्हीएमविरोधात येत्या ९ ऑगस्ट रोजी मनसे आंदोलन करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी  कोलकत्यातील सचिवालयात ममता यांची भेट घेतली. ईव्हीएमविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रणही त्यांनी ममता यांना दिले.

उभय नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवर बंदीची मागणी करत निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मतपत्रिकांचा वापर केला जावा, अशी मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे 
उपस्थित होते.

ईव्हीएमचे निकाल संशयास्पद
ममतांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज म्हणाले की, ‘‘आधुनिक राष्ट्रांनी निवडणुकीसाठी ‘ईव्हीएम’चा वापर करणे सोडून दिले असून तेही आता मतपत्रिकांचा वापर करू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील ३७० जागांचे निकाल संशयास्पद होते. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजणी झालेली मते यांच्या संख्येतही मोठी तफावत आढळून आली. याबाबत ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या मताशी आपण सहमत आहोत.’’

मुंबई भेटीचे निमंत्रण
मुंबईत नऊ ऑगस्ट रोजी ‘ईव्हीएम’विरोधात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून राज यांनी या मोर्चासाठी देखील ममतांना आमंत्रित केले आहे. ‘ईव्हीएम’विरोधातील लढ्यात आपण तुमच्यासोबत आहोत, असेही राज यांनी ममतांना सांगितल्याचे समजते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News