उतावळा नेमार, गुडघ्याला बाशिंग !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • बार्सिलोनामध्ये परत जाण्यासाठी सुपरस्टार नेमार उत्सुक
  • पत्रकारपरिषदेत पीएसजीच्या चाहत्यांना डिचवले
  • अवघ्या दोन वर्षांपूर्वी पीएसजीने नेमारला बार्सिलोनाकडून फुटबॉल जगतातील सर्वाधिक रकमेत (२२ कोटी २० लाख पौंड) खरेदी केले होते 

पॅरिस : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने पीएसजीविरुद्ध पिछाडीवरून मिळवलेला विजय आपण कधीही विसरू शकणार नाही, असे सांगत नेमारने आपण पीएसजी सोडून बार्सिलोनाकडे जाण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

काही महिन्यांपासून पीएसजी आणि नेमार यांच्यातील संघर्ष सुरू आहे. नेमारने बार्सिलोनाकडे परत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे पीएसजी व्यवस्थापन संतापले आहे. नेमारला जिथे जायचे असेल तिथे जावे, फक्त त्याला करारबद्ध करणाऱ्या क्‍लबने आमची रक्कम द्यावी, असे पीएसजीचे स्पोर्टिंग डायरेक्‍टर लिओनार्दो यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी पीएसजीने नेमारला बार्सिलोनाकडून खरेदी करण्यासाठी २२ कोटी २० लाख पौंड मोजले होते. हा करार होण्यापूर्वी पाच महिनेच बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीगमध्ये पीएसजीचा पाडाव केला होता. त्या वेळी पीएसजीने पहिल्या टप्प्यातील लढत ४-० जिंकली होती, पण बार्सिलोनाने दुसऱ्या टप्प्याची लढत ६-१ जिंकली होती. त्या वेळी बार्सिलोनाने अखेरच्या काही मिनिटांत तीन गोल केले होते. त्यात नेमारचे दोन गोल होते.

नव्या नेमारचा शोध कार्यक्रमात नेमारने ही लढत अजून आपल्या स्मरणात आहे असे सांगितले होते. आता पुन्हा एकदा पीएसजी चाहत्यांना डिवचताना त्याने एका मुलाखतीत याचा पुनरुच्चार केला आहे. त्यात त्याने या कामगिरीस ब्राझीलच्या ऑलिंपिक सुवर्णपदकांच्या रांगेत बसवले आहे. ब्राझीलच्या ऑलिंपिक सुवर्णपदकाचा आनंद विसरू शकणार नाही, तसेच पीएसजीविरुद्ध बार्सिलोनाचा विजयही, असे नेमारने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News