नवमतदार करू शकतात 4 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 September 2019
  • या समितीमध्ये सर्व विभागप्रमुखांसह सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगर पालिका मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकसुध्दा सदस्य आहेत.

यवतमाळ: महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. या तारखेपर्यंत जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी सुरू राहणार असून नाव नोंदणी करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्व नवमतदारांनी 4 ऑक्टोबरपर्यंत आपली नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने ‘स्वीप’ जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

‘स्वीप’ मोहीम हा निवडणूक आयोगाचा महत्वाचा कार्यक्रम आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व विभागप्रमुखांसह सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगर पालिका मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकसुध्दा सदस्य आहेत. आपापल्या कार्यालयात येणा-या नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, जिल्ह्यातील नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, ईव्हीएम तसेच आदीबाबत या माध्यमातून जनजागृती करावयाची आहे. 

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी विद्यार्थ्यांमार्फत घराघरांमध्ये मतदानाचा संदेश पोहचवावा. यासाठी निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पत्रे पाठविणे, असे उपक्रम राबवावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाने या कामगारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानाचे महत्व समजावून सांगावे.

जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था, त्यांचे सभासद व इतर सहकारी संस्थांमध्ये मतदार जनजागृती करावी. औद्योगिक क्षेत्राशी संबंधित असणा-या संघटनांची जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी त्वरीत बैठक घ्यावी. 

मतदानाच्या दिवशी त्यांच्या आस्थापनांवरील कामगारांना नियमानुसार मतदानासाठी सवलत देणे, एकही कामगार मतदानापासून वंचित ठेवू नये, याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच ईव्हीएम वापराबाबत कामगारांसाठी एमआयडीसीमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

‘ॲक्सेसेबल निवडणूक’ हे निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे. त्यासाठी दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचणे, त्यांची नोंदणी करणे, मतदानासाठी त्यांना प्रवृत्त करणे, यासाठी त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविणे, त्यांच्या ने-आण करण्याची व्यवस्था करणे आदींबाबत निवडणूक आयोग अतिशय गंभीर आहे.

त्यामुळे जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे. समाजकल्याण विभागाने दिव्यांग मतदारांच्या याद्या त्वरीत संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पाठवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. 

बैठकीला एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, उपनिबंधक अर्चना माळवे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगर पालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिका-यांनी दिली विद्यार्थ्यांना शपथ-

तत्पूर्वी ‘स्वीप’ जनजागृती मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी 79 - दिग्रस विधानसभा मतदारसंघ दारव्हा येथील कै. विरजी भिमजी घेरवरा हायस्कूल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी  विद्यार्थ्यांना 18 वर्षे वय पूर्ण केल्यावर मतदार होण्याचे व विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक, नातेवाईकांना मतदान करण्याचे आवाहन केले व विद्यार्थ्यांना शपथ दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी इब्राहीम चौधरी, दारव्हाचे तहसीलदार अरुण शेलार, नेरचे तहसीलदार अमोल पोवार, दारव्हा न.प. मुख्याधिकारी कोहाड आदी उपस्थित होते. 

तसेच जिल्हाधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाला भेट देऊन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया, स्ट्राँग रुम, मतमोजणी कक्ष, मतदान केंद्रावर पुरविण्यात येणा-या सुविधा आदींचा आढावा घेतला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News