महाराष्ट्रात आता आणखी एका नव्या पक्षाची घोषणा, सोमवारी पक्षाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • लक्ष्मण माने यांच्या नव्या पक्षाची घोषणा
  • ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ स्थापन

पुणे : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी बुधवारी ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी’ नावाचा नवीन पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. आरपीआयचे १५० पक्ष व ५० संघटनांसह राज्यातील अनेक संस्था- संघटना आपल्याबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

डाव्या आघाडीच्या पक्षांसह आपला पक्ष काम करणार असल्याचे त्यांनी कॅम्पमधील अरोरा टॉवरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जनता दल (सेक्‍युलर)चे महासचिव निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, शेतकरी कामगार पक्षांचे शहराध्यक्ष सागर आल्हाट, भारतीय समाजवादी रिपब्लिकचे जयराज रजपूत या वेळी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी ४८ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भाजपलाच फायदा झाला. काही ठिकाणी तर त्यांना आघाडीमुळे मताधिक्‍य मिळाले. आता तर आघाडीत जाहीरपणे आरएसएसचे लोक काम करू लागले आहेत, असा आरोप माने यांनी केला. 

लोकसभेत जी चूक केली, तीच चूक मी विधानसभेत करणार नाही, त्यामुळे नव्या पक्षाद्वारे भाजपपुढे आव्हान निर्माण केले जाईल. डाव्या आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांसह जागावाटपाबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लवकरच चर्चा करण्यात येणार आहे, असेही माने यांनी सांगितले. 

सोमवारी पक्षाचे उद्‌घाटन
सोमवारी पक्षाचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. पक्षाची कार्यकारिणी त्यात जाहीर करण्यात येईल, असे माने म्हणाले. वंचितचे नेते डॉ. अब्दुल रहमान यांच्यावर मी कोणतीही वैयक्तिक टीका केलेली नाही. माझे वक्तव्य हे राजकीय आहे, ते त्यांनी खोडून काढावे. तसेच, त्यांनी केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्याबाबत माझ्या वकिलांशी बोलून त्यांच्या नोटिशीला उत्तर देऊ, असे माने यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News