या चार खेळाडूंमधून निवडला जाणार भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • द्रविड, पाँटिंगसह लक्ष्मण, कॅलिसही स्पर्धेत
  • अर्ज करण्याची मुदत ३० जुलै रोजी संपत आहे

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक; तसेच सहायक प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची मुदत ३० जुलै रोजी संपत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, फलंदाजी प्रशिक्षकासाठी तीन कर्णधारांसह पाच जण शर्यतीत असल्याचे समजते. यात राहुल द्रविड, स्टिफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग यांच्यासह व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, जॅक कॅलिस यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर संजय बांगर यांना हटविणार, हे निश्‍चित होते. ते पुन्हा अर्ज करू शकतात; पण खेळाडूंचा कितपत पाठिंबा मिळणार, हा प्रश्‍नच आहे. सध्या चर्चेत असलेल्या प्रशिक्षकांमध्ये द्रविड वगळता अन्य उमेदवारांमधील साम्य म्हणजे त्या प्रत्येकाला आयपीएलचा चांगलाच अनुभव आहे. 

प्रशिक्षणासाठी लक्ष्मणखेरीज अन्य उमेदवारांकडे चांगला अनुभव आहे. फ्लेमिंग आयपीएलमध्ये तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक असून, खेळाडू म्हणूनही त्याची कामगिरी चांगली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ८, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजारांहून अधिक धावा त्याच्या नावावर आहेत.

भारताच्या लक्ष्मणकडे थेट प्रशिक्षकपदाचा अनुभव नसला, तरी तो आयपीएलमध्ये हैदराबाद संघाचा मेंटॉर राहिला होता. फलंदाज म्हणून त्याने ८ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. कॅलिस यालाही आयपीएलमध्ये नाईट रायडर्स संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. फलंदाज म्हणून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. 

रिकी पाँटिंग हादेखील आयपीएलमधूनच प्रशिक्षक म्हणून पुढे आला असला, तरी त्याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या सहायक प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. राहुल द्रविड याच्याकडे भारतीय युवा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय युवा संघाने चमकदार कामगिरी केली. 

अर्थात, फलंदाजी प्रशिक्षकाच्या शर्यतीत द्रविडचे नाव पुढे येत असले, तरी काही दिवसांपूर्वी त्याने आपल्याला युवा पिढीला घडवण्यात रस असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता यातूनच भारताचा फलंदाजी प्रशिक्षक ठरणार की अन्य कोणी येणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News