नेहरू-गांधींमुळे बेरोजगारी नाही ; उद्धव ठाकरेंचा सरकारला टोमणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • ‘सामना’तील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांचा सरकारला टोमणा 
  • दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन कुठे गेले ?

 

मुंबई - देशातील बेरोजगारीची जबाबदारी नेहरू- गांधींवर टाकता येणार नाही, अशा शब्दांत ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला टोमणे लगावले आहेत.

‘देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के झाला. मागील ४५ वर्षांतला हा सर्वांत जास्त आकडा आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे. हे आकडे सरकारचेच आहेत, आमचे नाहीत. सरकार पक्षाचे म्हणणे असे, की बेरोजगारी वाढत आहे हे काही आमचे पाप नाही.

बेरोजगारीचा प्रश्न हा काही गेल्या पाच वर्षांत भाजपने तयार केलेला नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पण दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगारांचे लक्ष्य पार करायला हवे होते, ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू- गांधींवर टाकता येणार नाही,’ असे शिवसेनेने म्हटले आहे.

जीडीपी दर घसरला
‘दिल्लीत नवे सरकार कामास लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या चित्रावर आव्हानांचे काळे ठिपके स्पष्ट दिसू लागले आहेत. देशाची आर्थिक घडी साफ विस्कटली आहे. आभाळ फाटले आहे, त्यामुळे शिवणार तरी कुठे अशी अवस्था झाली आहे.

मोदींचे सरकार येत आहे म्हटल्यावर सट्टा बाजार आणि शेअर बाजार उसळला; पण जीडीपी घसरला व बेरोजगारीचा दर वाढला हे लक्षण काही चांगले नाही. बेरोजगारीचे संकट असेच वाढत राहिले तर काय करायचे, यावर फक्त चर्चा करून व जाहिरातबाजी करून उपयोग नाही, कृती करावी लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News