देशाच्या वेगवान विकासासाठी एकत्रित निवडणूक व्यवस्थेची नितांत गरज : राष्ट्रपती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • राष्ट्रपतींचे प्रतिपादन : दहशतवाद निपटण्यास सर्वोच्च प्राधान्य
  • तोंडी ‘तलाक’ आणि ‘निकाह हलाला’ या कुप्रथांचे उच्चाटन आवश्‍यक​

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेच्या पहिल्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणातून ‘नया भारत’ निर्माणाचा आराखडा मांडला. देशाच्या वेगवान विकासासाठी एकत्रित निवडणूक व्यवस्थेची नितांत गरज असून ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ यासाठी खासदारांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

सतराव्या लोकसभेच्या पहिल्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणातून ‘नया भारत’ निर्माणाचा आराखडा मांडला. देशाच्या वेगवान विकासासाठी एकत्रित निवडणूक व्यवस्थेची नितांत गरज असून ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी खासदारांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. राष्ट्रीय सुरक्षेत कोणतीही हयगय केली जाणार नाही. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक (हवाईहल्ले) यातून क्षमता सिद्ध केली आहे. भविष्यातही कठोर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.

यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी लेखानुदान मंजुरीसाठी झालेल्या छोटेखानी अर्थसंकल्पी अधिवेशनात ३१ जानेवारीला अभिभाषण झाले होते. त्यानंतर नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आज पुन्हा अभिभाषण झाले. तोंडी तलाक विरोधी विधेयक मंजुरी, एकत्रित निवडणुका या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर अभिभाषणात भर होता. देशाच्या वेगवेगळ्या भागात सातत्याने होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासाला खीळ बसते. आता ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही काळाची गरज आहे. राजकीय पक्षांनाही आपल्या विचारसरणीनुसार विकासात योगदान देता येईल. त्यामुळे सर्व खासदारांनी एकत्रित निवडणुकांच्या ‘विकासाभिमुख’ प्रस्तावावर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. 

तोंडी ‘तलाक’ आणि ‘निकाह हलाला’ या कुप्रथांचे उच्चाटन आवश्‍यक असून भगिनी आणि कन्यांचा सन्मान वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी ‘तोंडी तलाक विरोधी कायदा संमत करण्याचे आवाहन केले. नवभारत संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल. मात्र त्यासाठी सुरक्षा सर्वात महत्त्वाची असून दहशतवाद आणि नक्षलवाद निपटून काढण्यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल. घुसखोरांचा अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला असलेला धोका पाहता ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ची (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन - एनआरसी) अंमलबजावणीला प्राधान्य दिले जाईल, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News