सेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादी काढणार शिवस्वराज्य यात्रा

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 2 August 2019

आपल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढण्याची तयारी सुरू

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेला प्रत्त्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. लोकप्रिय अभिनेते व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा काढण्यात येणार असून, सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे यात्रेचे स्टार प्रचारक असतील अशी माहिती मिळत आहे. येत्या ६ ऑगस्टपासून ही यात्रा जुन्नरमधून होईल. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार आहेत.

विधानसभा निवडणूक दोन अडीच महिन्यावर आली आहे. यासाठी भाजप- शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप-सेनेत जात आहेत. सोबतच या दोन्ही पक्षांनी यात्रेचे आयोजन केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेची राज्यव्यापी जन आशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाजनादेश यात्रा गुरूवारी १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष जनतेपर्यंत जाऊन पुन्हा एकदा सत्तेचा कौल मागत आहेत.

 भाजप- शिवसेनेने विरोधी पक्षांचे मानसिक खच्चीकरण केले आहे. त्यामुळे पक्षात निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे पक्षातील अस्वस्था संपविण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच करणार असल्याची माहिती आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News