काँग्रेसच्या मागणीने राष्ट्रवादी तोंडघशी; विधानसभा निवडणुकीपुर्वीच जागांवर दावेदारी

मंगेश शेवाळकर
Monday, 1 July 2019
  • जिल्हयात विधानसभा निवडणुकीसाठी  राजकिय पक्षांच्या हालचाली सुरु
  • काँग्रेसच्या बैठकीत वसमत विधानसभेची जागा सोडवून घेण्याची मागणी
     

हिंगोली - जिल्हयात विधानसभा निवडणुकीसाठी  राजकिय पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या असून राजकीय पक्षांच्या बैठकांना ऊत आला आहे. त्यातून विधानसभा मतदार संघावर होणाऱ्या दावे प्रतिदावे यामुळे राजकीय रंगत वाढली आहे. काँग्रेसच्या बैठकीत वसमत विधानसभेची जागा सोडवून घेण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादी तोंडघाशी पडली आहे.  

हिंगोली विधानसभा मतदार संघात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. हिंगोलीत सध्या भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, कळमनुरीत काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे तर वसमतमधे शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा विद्यमान आमदार 
आहेत. 

या तीन विधानसभा मतदार संघात आघाडीमधे हिंगोली व कळमनुरीची जागा काँग्रेसकडे तर वसमतची जागा राष्ट्रवादीकडे  आहे. तर युतीमधे कळमनुरी व वसमतची जागा शिवसेनेकडे तर हिंगोलीची जागा भाजपाकडे आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याने राजकिय हालचाली  सुरु झाल्या आहे. त्यासाठी पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकाही सुरु असून त्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहू लागली आहे.

दरम्यान, नुकत्याच राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीमधे आगामी निवडणुकीबाबत चर्चा करून हिंगोली किंवा कळमनुरीची जागा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या जागेवर राष्ट्रवादी डोळा ठेऊन असल्याचे चित्र आहे. वसमत विधानसभेसोबतच हिंगोलीची जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास पक्षवाढीसाठी फायदा होईल असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

या बैठकीनंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी  हिंगोलीत बैठक झाली. यावेळी पक्षसंघटन मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर वसमत विधानसभेची जागा काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली. हिंगोली, कळमनुरी सह वसमतची जागाही काँग्रेसला ठेवावी अशी अग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली 
आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या या मागणीमुळे हिंगोलीच्या जागेवर डोळा ठेऊन असलेले राष्ट्रवादीचे नेते मात्र तोंडघाशी पडले आहेत.

बैठकांमधून विनाकारण उठसूठ मागणी करीत बसलेल्या 
राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेसच्या बैठकीतून चांगलेच प्रत्युत्तर देण्यात आले. मागील निवडणुकीत दहा हजार मतदान मिळवू शकलेल्या राष्ट्रवादीला जागा कशासाठी सोडायची असा प्रश्नही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता निवडणुकीपुर्वीच काँग्रेस व राष्ट्रवादीमधे दावेदारीवरून घमासान सुरु झाल्याचे चित्र आहे. तर काँग्रेसच्या या मागणीनंतर राष्ट्रवादीला बॅकफुटवर यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News