निसर्गाच्या कोंदणातील हा बलाढ्य 'मार्लेश्‍वर'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019

आपल्याला आठवड्याभराच्या दगदगीनंतर येणारे सुटीचे दिवस काहीसे निवांत जावेत, असं वाटत असतं. पावसाळ्यात या निवांतपणाची निकड अधिकच तीव्र होते. जून महिना सरलेला असावा, पावसाच्या सरींनी धरित्री तृप्त झालेली असावी, मखमलीसम भासणारी तृणपाती मंद वाऱ्याच्या झुळुकांवर झुलत असाव्यात, सततच्या वर्दळीनं धुळीनं माखलेली वृक्षवल्लरी ताजीतवानी झालेली असावी. असा योग जुळून आल्यानंतर निसर्गानं साद घातली नसती तरच नवल.

आपल्याला आठवड्याभराच्या दगदगीनंतर येणारे सुटीचे दिवस काहीसे निवांत जावेत, असं वाटत असतं. पावसाळ्यात या निवांतपणाची निकड अधिकच तीव्र होते. जून महिना सरलेला असावा, पावसाच्या सरींनी धरित्री तृप्त झालेली असावी, मखमलीसम भासणारी तृणपाती मंद वाऱ्याच्या झुळुकांवर झुलत असाव्यात, सततच्या वर्दळीनं धुळीनं माखलेली वृक्षवल्लरी ताजीतवानी झालेली असावी. असा योग जुळून आल्यानंतर निसर्गानं साद घातली नसती तरच नवल.

पावसाळ्यात भटक्यांचे वेगवेगळे गट स्वच्छंद भटकंतीसाठी बाहेर पडतात. काहींना गड-किल्ल्यांचं आकर्षण असतं, तर काहींना केवळ निसर्गाची भूल पडलेली असते. अशा भटक्यांसाठी एक मस्त ठिकाण आहे. कोकणातलं मार्लेश्‍वर.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखपासून अवघ्या २० किलोमीटरच्या आत पाच प्रेक्षणीय मंदिरं आहेत. त्यापैकी पहिलं आहे मार्लेश्‍वर, दुसरं टिकलेश्‍वर, तिसरं कर्णेश्‍वर, चौथं केदारलिंग आणि पाचवं सोळजाईदेवी. देवरुखपासून पाच किलोमीटरवरील एका टेकडीवर टिकलेश्‍वर हे सुंदर शिवमंदिर आहे. कर्णेश्‍वर मंदिर १७ किलोमीटरवरच्या संगमेश्‍वरजवळ आहे. हेमाडपंती शैलीतलं हे मंदिर खूपच सुंदर आहे. सुमारे १० किलोमीटरवरच्या केतवली गावचं ग्रामदैवत असलेलं केदारलिंग मंदिर आणि ग्रामदेवता सोळजाईदेवीचं मंदिर देवरुखमध्येच आहे. देवीच्या या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी भेट दिल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो.

देवरुखमध्ये वड आणि पिंपळाचे भरपूर वृक्ष आहेत. या वृक्षांचा उल्लेख देववृक्ष असा करण्यात आला आहे. त्याचाच अपभ्रंश होऊन गावाचं नाव देवरुख असं पडलं.या पाच मंदिरांपैकी मार्लेश्‍वर या १७ किलोमीटरवरचं मंदिर अनोखं आहे. शिवमंदिरं ही नेहमीच आडबाजूला किंवा अवघड ठिकाणी असतात. संस्कृती आणि निसर्गाशी सांगड घालणारी असतात. एकेकाळी अवघड असलेली अनेक शिवमंदिरं आता सहज जाण्यासारखी झाली आहेत. अनेक मंदिरांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्तेही तयार झाले आहेत. मार्लेश्‍वराचं मंदिर गुहा मंदिर आहे. इथं अचंबित करणारी सुंदर शिल्पं नाहीत, तरीही हा परिसर त्याच्या निसर्गदत्त देणगीनं भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो.

मंदिर ज्या डोंगरात आहे, त्याच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून प्रशस्त बांधीव पायऱ्यांच्या वाटेनं निसर्गानं मुक्तहस्ते केलेली उधळण पाहत मंदिरापर्यंत जाता येतं. पावसाळी वाटेत अनेक ओहोळ आणि झरे वाहताना दिसतात. आसपासच्या डोंगरांतून कोसळणारे धबधबे पाहताना मन वेडावून जातं. डोंगरातील अखंड खडकात खोदून काढलेल्या एका गुहेत शिवलिंगाची स्थापना केली आहे. गुहामंदिराच्या जवळच एक मोठा धारेश्‍वर नावाचा धबधबाही चित्त उल्हसित करणारा ठरेल. गुहा लहानशीच आहे आणि प्रवेशद्वार लहान असल्यानं वाकूनच गुहेत प्रवेश करावा लागतो. गुहेत दोन शिवलिंगं आहेत.

त्यापैकी एक मल्लिकार्जुन आणि दुसरे मार्लेश्‍वर. प्रत्येक मकरसंक्रांतीला मार्लेश्‍वराचा दोन दिवसांचा उत्सव असतो आणि त्या दिवशी शिवाचा पार्वतीशी विवाह लावण्यात येतो. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. त्याची वधू साखरपा या गावातली गिरिजादेवी, म्हणजे पार्वतीचाच अवतार. काही अंतरावर कोसळणाऱ्या धबधब्याखाली एक नैसर्गिक कुंड तयार झालंय. हाच संगमेश्‍वरातून वाहणाऱ्या बाव नदीचा उगम आहे.

पावसाळ्यात धबधब्याचा आवेग खूप जास्त असल्यानं, प्रवाहाचा अंदाज घेऊनच धबधब्याखाली आंघोळ करावी.
मार्लेश्‍वरमध्ये निवासाची सोय नाही, परंतु देवरुख आणि संगमेश्‍वर परिसरांत अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. या ठिकाणी भोजन आणि निवासाची सोय होऊ शकेल. स्वतःचं वाहन असल्यास सर्व ठिकाणांना सोयीनुसार भेट देता येईल. देवरुखहून ७२ किलोमीटरवर जयगड किल्ला आणि बीच, तसंच ६० किलोमीटरवरच्या गणपतीपुळेलाही भेट देता येईल.
 कसे जाल? : पुण्याहून सातारा, कऱ्हाड, शाहूवाडीमार्गे २७१ किलोमीटर. भोर, वरंध, पोलादपूर, खेड, चिपळूणमार्गेही तेवढंच अंतर आहे. मुंबईहून गोवा महामार्गाद्वारे ३१३ किलोमीटर.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News