राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग तुमच्या दारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • 1ऑगस्टला होणार विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर

यवतमाळ: बालकांवरील होणाऱ्या विविध प्रकारच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्याकरीता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता येथे विभागीय स्तरावर तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

या शिबिरात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून पालक तक्रार दाखला करू शकतात. त्याकरिता आयोगामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील बालक पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, बचत गट यांनी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज सर्व विभागांना महसूल भवन येथे पार पडलेल्या बैठकीत सूचना दिल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी एस. बी. महिन्द्रकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.जी.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) विशाल जाधव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी माविम डॉ.रंजन वानखेडे, पोलीस निरीक्षक एस.एस.आमले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, महसूल विभागातील अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा येथील प्रतिनिधी, अपर्णा गुजर जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन यवतमाळ, शाळा, महाविद्यालये व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर शिबिरामुळे बालकांवरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यानी निती आयोगाने निवडलेल्या देशातील ११५ आकांक्षित जिल्हामध्ये वाशीम जिल्हा असून, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत वाशीम येथे तक्रार निवारण शिबीर आयोजित केले जात आहे. यामध्ये यवतमाळ सह अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्हातील बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक विषयक तक्रारीवर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे या जिल्हातील प्रत्य्रेक बालक व पालकांपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.
 
१ ऑगस्ट २०१९ रोजी वाशीम मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे तक्रार निवारण शिबीर होणार असून, सकाळी ९.०० वाजेपासून तक्रारीची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १०.०० वाजेपासून सुनावणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे निवासी अश्रमशाळा, बालकांची काळजी घेणारी संस्था, बालगृह, वस्तीगृह रस्त्यावर राहणारी बालके, शाळकरी बालके किवां इतर ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेली किंवा निवासी राहत असलेली प्रत्येक घटकातील बालके आयोगासमोर स्वतः तक्रार दाखल करू शकतात. किंवा बालकांच्या वतीने इतर कोणीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते.

या तक्रार निवारण शिबिरा विषयीची माहिती सर्व अंगणवाडी, शाळा, आश्रम शाळा, निवासी शाळा येथील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी तसेच सरकारी कामगार अधिकारी यांनी त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक व्यापारी आस्थापना, व्यावसायिक यांना नोटीस देऊन याबाबत माहिती द्यावी.

प्रत्येक गावामध्ये २ वेळा दवंडी देवून शिबिराबाबत माहिती देण्यात यावी. तसेच ग्रामसेवकामार्फत प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये नोटीस लावण्यात यावी. तसेच अमरावती विभागातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यात इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून शिबिराची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी, आशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या. 

बाल कामगार निर्मुलन किंवा त्रासात असलेल्या बालकांबाबतच्या तक्रारी, बाल न्याय किंवा दुर्लक्षित, अपंग, बालकांच्या काळजी बाबतच्या तक्रारी, अँसिड हल्ला, भिक्षा वृत्ती, बालकांचे शोषण, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालकांची खरेदी विक्री, अपहरण, शिक्षण याविषयीच्या तक्रारी, बाल न्याय अधिनियम २०१५, बालकांच्या संबंधित कायदा पोक्सो कायदा २०१२, बालविवाह कायदा २००६, माहिती तंत्रज्ञान २००० आदी कायद्यांचे उलंघन यासह बालकांवर होणारा अन्याय व अत्याचार विषयक तक्रारी, बालकांचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास या विषयीचा तक्रारी या शिबिरामध्ये दाखल करता येणार आहेत. या तक्रार निवारण शिबिराविषयी अधिक माहिती साठी संपर्क अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News