नांदेडमध्ये नृत्याच्या ठेक्यावर तरुणाई धुंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

शिबिराचे सहाव्या आणि सातव्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या दीक्षांत मंचावर करण्यात आले होते.

नांदेड - हळुवार पावलांनी उतरून येणारी रात्र, कोसळलेल्या मृग सरींनी हवेत पसरलेला गारवा आणि संगीत, नृत्य, गायन, वादनावर आव्हान-२०१९’  रविवारी संध्याकाळी तरुणाई धुंद झाली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहादिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात राज्यभरातून आलेल्या तरुणांचा उदंड उत्साह निर्माण झाला होता.

शिबिराचे सहाव्या आणि सातव्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या दीक्षांत मंचावर करण्यात आले होते. वीस विद्यापीठांतून आलेल्या तेवीस जिल्ह्यांतील संघांनी रविवारी आपली कला विविध माध्यमातून सादर केली. नृत्य, नाट्य, वादन, गायनाच्या तालावर मंचावरील कलावंतांसोबत प्रेक्षकांनीही ठेका धरून आपला आनंद या वेळी व्यक्त केला. मुंबई, हिंगोली, अकोला, जळगाव, धुळे, वाशीम, दापोली, नाशिक, पालघर, गोंदिया, नागपूर, बुलडाणा, गडचिरोली, नांदेड आणि तेवीस जिल्ह्यांतील एनएसएस प्रशिक्षनार्थींनी आज एकांकिका, नाटक, कव्वाली, लावणी, भारुड, लघुनाट्य, विडंबन, मुकनाट्य, लोकगीत, पोवाडा आदी कलाप्रकार सादर करून उपस्थितांची माने जिंकली. एखाद्या व्यवसायिक कलावंत इतकेच समरस होऊन विद्यार्थ्यांनी आपली कला अभिव्यक्त केली.

स्त्री भ्रूण हत्या, स्त्री शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य चळवळीतील हौतात्म्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून वाचा फोडली. ‘डंग डंग बाई हलगी वाजती, वंदे मातरम्, खंडे रायाच्या लग्नाला बानू नवरी सजली, आमचे दैवत छत्रपती, मेरा रंग दे बसंती चोला’ अशा गाण्यांनी सगळे सभागृह नृत्यमग्न झाल्याचे दृश्य या वेळी पाहावयास मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पांडुरंग पांचाळ, डॉ. कुमार बनसोडे, डॉ. दशरथ भिसे, डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, व्यवस्थापक परिषद सदस्य डॉ. महेश मगर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेष वाढेर, दूरशिक्षण विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. राम जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, ‘आव्हान-२०१९’चे समन्वय डॉ. अविनाश कदम, डॉ. पृथ्वीराज तौर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहायक कुलसचिव डॉ. दिगंबर तंगलवाड, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News