संगीता ठोंबरेंना टक्कर देण्यासाठी नमिता मुंदडांची केजमधून जोरदार तयारी

जालिंदर धांडे
Sunday, 16 June 2019
  • अक्षय मुंदडा आणि समर्थकांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जोरदार तयारी केली आहे

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत केज मतदार संघातून भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे व राष्ट्रवादीच्या नेत्या नमिता मुंदडा यांच्यातच लढत होणार हे निश्चित असून सद्यस्थितीत दोघींना समान संधी वाटत असली तरी ऐनवेळी राजकीय समिकरणे कोणाच्या बाजूने झुकतात यावर निकाल असेल.

संगीता ठोंबरेंना टक्कर देण्यासाठी मुंदडा कुटूंबियांनी पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासून सुरु केलेली जोरदार तयारी वाढतच आहे. संगीता ठोंबरेंकडे विकास कामांची यादी असली तरी नमिता मुंदडांकडे वैयक्तीक संपर्क, सुख - दुखात दिलेली साथ अशी सहानुभूती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोनाची शिदोरी आहे.
दिवंगत लेकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी केज मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधीत्व करत दोन वेळा मंत्रीमंडळात विविध खाती सांभाळत आपल्या कामाची राज्यात छापही पाडली.

मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या नमिता मुंदडांना आमदारकिच्या खुर्चीत बसवण्यासाठी सासरे नंदकिशोर मुंदडांसह पती अक्षय मुंदडा आणि समर्थकांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जोरदार तयारी केली आहे. लग्न, मुंज, सांत्वन, वाढदिवस अशा मतदार संघातील कुठलाही  कार्यक्रमाला नमिता मुंदडा हजर राहत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारनिमित्त त्यांनी मतदार संघ ढवळून काढला आहे. तीन महिन्यांपूर्वी परळी येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर त्यांनी अगदीच जोराने तयारी सुरू केली आहे.

आता त्यांनी दुष्काळ नुकसान भरपाई, पीक विमा आशा शेतकरी प्रश्नांवर त्यांनी केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद भेटत आहे. सासूबाई दिवंगत विमल मुंदडा यांनी 25 वर्षांत मतदार संघात केलेली विकास कामे आणि सासरे नंदकिशोर मुंदडा व पती अक्षय मुंदडा यांनी विणलेले कार्यकर्त्यांचे जाळे हो त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.

तर, भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी साडेचार वर्षांच्या काळात मतदार संघात राबविलेल्या विकास कामांची शिदोरीच्या जोरावर त्या रिंगणात उतरणार आहेत. मतदार संघात ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून झालेली गावांतर्गत रस्ते, सभागृहे, नाल्या अशी कामे आणि राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

संगीता ठोंबरे यांच्या वैयक्तीक संपर्कासह पती विजयप्रकाश ठोंबरे यांनीही मतदार संघात कामाच्या माध्यमातून आपला संपर्क वाढविला आहे. त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघातून भाजपला २१ हजारांचे मताधिक्क्य भेटले असले तरी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक विधानसभेला कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून असेल.

आताही उर्वरित कालावधीत त्या किती विकास कामे खेचून आणतात आणि उर्वरित कामांना किती गती देतात यावरही विधानसभेची लढाई महत्वाची ठरणार आहे. या मतदार संघात भाजपला मानणारा मोठा वर्ग ही देखील संगीता ठोंबरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. एकूणच या दोघींचीही जोरदार तयारी असून त्यांच्या यावेळी काट्याची लढत होणार हे निश्चित आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News