वाघडोह वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची नावे स्टेनसील्ड चिपवर कोरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • ‘नासा’चा उपक्रम; बुधवारी करणार मंगळाच्या दिशेने उड्डाण

कोळेगाव - जिल्हा परिषदेच्या वाघडोहवस्ती (कोळेगाव, ता. माळशिरस) शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा थेट मंगळ ग्रहावर भरणार आहे.

मुख्याध्यापिका प्रिया तोरणे यांनी नुकतीच त्यासाठी शाळा, शिक्षकांसह विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यांचे बोर्डिंग पासदेखील आले आहेत. बुधवारी हे यान अवकाशात उड्डाण करेल.

‘नासा’ या अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळरोव्हर २०२०’ हे अंतराळयान लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाकडे झेपावेल.

या अंतराळ यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी ‘नासा’च्या वतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. वाघडोह वस्ती शाळेच्या मुख्याध्यापक प्रिया तोरणे व शिक्षिका राबिया शेख यांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षक व शाळेचेही नाव या उपक्रमासाठी नोंदवले होते.

दहा लाख नावे असलेले चिपरोव्हर
‘मंगळरोव्हर-२०२०’ हे यान ‘ॲटलस V ५४१’ या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानाव्हेराल इथल्या सैन्यदलाच्या तळावरून १७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० मध्ये लाँच केले जाणार आहे. ते २०२१ च्या फेब्रुवारीत मंगळावर पोहोचण्याची शक्‍यता आहे. ‘नासा’च्या कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या (JPL) रोडिव्हायसेस लॅबोरेटरीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्‍या (७५ नॅनोमीटर) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्‍या लहान आकारात एक सेंमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील

विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी यासाठी त्यांची नावे पाठवली होती. नावे मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे.
- प्रिया तोरणे, मुख्याध्यापिका, वाघडोह वस्ती

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News