आठवणीतील नागपंचमी

सौ. राजश्री भावार्थी
Monday, 5 August 2019
  • नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन असे अनेक सणांच्या आठवणीनी मनाला हुरहूर लागून राहायची! कोणाच्याही घरचे कार्य निघाले की अख्खा शेजार पाजार एकत्र यायचा! न सांगता कामे वाटून घेतली जायची.

दरवर्षी श्रावण आला की मन बालपणीच्या हिंदोळ्यावर नाचू लागते. पूर्वी सणवार म्हटले की खूप रेलचेल असायची ! नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन असे अनेक सणांच्या आठवणीनी मनाला हुरहूर लागून राहायची! कोणाच्याही घरचे कार्य निघाले की अख्खा शेजार पाजार एकत्र यायचा! न सांगता कामे वाटून घेतली जायची. अशा अनेक गोष्टी आयुष्याच्या या टप्प्यावर ही अलगद मनाच्या कप्प्यात विसावतात.

खरेच आपली पिढी सगळ्याच बाबतीत खूप अनुभवी उत्साही होती. कोणतीही गोष्ट आपण अनुभवातून शिकत गेलो. त्या साठी कुठल्याही किचन ट्रेनिंग ची गरज नसायची ! वा अन्य ! थोरा मोठ्यांचे पाहात पाहात आपण पावले टाकली. मैत्रीच्या नात्याने तर ओंजळ पूर्ण भरलेली असे. ना कसले हेवेदावे! राग नसावा पण अनुराग असावा!

वाट्याला आलेले आयुष्य कसे भरभरून जगावे हे भरल्या घरात शिकत गेलो. आयुष्याला आत्मविश्वासाने सामोरे जायचे बळ आपसूकच मिळत होते, जेंव्हा थोरामोठ्यांचा हात पाठीवरून फिरायचा आणि आम्ही आहोत ना !

या शब्दांनीच धीर मिळायचा ! नि जग जिंकल्याचा अविर्भावात आत्मविश्वास प्राप्त व्हायचा ! तर हे सगळे आठवायचे कारण नागपंचमी या सणाशी निगडित ! लीना माझी मैत्रीण आमच्याच घराजवळ राहायची. माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान !

बालपण मस्त मजेत सरत होते. आमची दोन्ही घरे संपन्न ! अचानक एका वळणावर लीना वडिलांना पोरकी झाली ! होता तेवढा पैसा हॉस्पिटल पायी खर्च झाला. पुढे काय? ही दोन भावंडे आणि आजी-आजोबा यांचा भार लीना च्या आई वर पडला. म्हातारे आजी-आजोबा तर पूर्ण हतबल झालेले. लीना, त्या वेळी नुकतीच सातवीत होती. सगळं भरलं घर क्षणात पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळलं. पुढं काय हा प्रश्न 'आ' वासून उभा राहिला. अशा वेळेस अनेकांनी धीर दिला. लीना ची आई माझ्या आई ची मैत्रीण !

माझ्या आई ने तिला बराच आधार दिला त्या काळात ही नोकरी करून घरी शिवणकाम करायला म्हणून माझ्या आईने तिला शिवणयंत्र घेऊन दिले. सण आला की आम्हा भावंडांबरोबर त्या बहीण-भावांना ही कपडे खरेदी होत ! कोठेही उपकाराची भाषेचा गंध नव्हता. फक्त एक कुटुंब सावरले पाहिजे ही भावना त्या मागे असायची.

माझे घराणे उच्चशिक्षित ! सगळाच शिक्षकी पेशा ! सरस्वती बरोबरच लक्ष्मीचा वास ! ज्ञान दिल्याने वाढते. तसेच दान केल्याने पुण्य मिळते म्हणण्यापेक्षा त्यांची गरजभासते, एखाद्या कुटुंबाला आपला हातभार लागतो. लीना पण आई प्रमाणे सोशिक न समंजस ! लहान वयातही कसली अपेक्षा करत नव्हती. फक्त अभ्यास या एकाच ध्येयाने तिला झपाटले होते.

एकदा नागपंचमी जवळ आली तशी ती अस्वस्थ दिसली. त्याचे कारण विचारले तर, माझ्या आई ने तिला बांगड्या, ड्रेस पण घेऊन दिलेला. त्या वेळेस अशी पद्धत होती की कपडा घेऊन छान छान फ्रॉक, परकर पोलकं वगैरे सणावाराला शिवायचं पण लिनाकडून बांगड्या जमिनीवर पडून फुटल्या. तिच्या आई कडून तिला खूप ओरडा बसला होता. गोष्ट छोटीशी होती पण पैशाचे मूल्य व त्या मागच्या भावना खूप महत्वाच्या ! नंतर पुन्हा तिला बांगड्या मिळाल्या हा भाग वेगळा. मेहंदी चा प्रोग्रॅम तर साग्रसंगीत चालायचा. जरी काठच्या कापडाचे परकर पोलकं घालून आम्ही दोघी मैत्रिणी झोका खेळायला सज्ज झालो होतो.

ऊन-पावसाच्या लपंडावात हरवून गेलो होतो. मनाशीच कविता गुंजन घालीत होत्या, त्या बालकवींच्या "श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे" त्या वेळेस फोटो काढायच्या एवढ्या आठवणी नसायच्या किंबहुना सगळेच सण दणक्यात साजरे व्हायचे.

कालांतराने कुटुंब विभागली ! हल्ली प्रत्येक सण त्या कुटुंबातील तीन ते चार जण यातच साजरा होतो सणाच्या महत्वापेक्षा ही सेल्फी चे महत्व वाढले. कालपरत्वे आपण ही बदल स्वीकारतोय हा भाग वेगळा, पण स्मरणातल्या याच सरी, बेधुंद होऊन पुन्हा-पुन्हा, खुणावतात मनाला. म्हणतात ना, आठवणी या मोरपिसासारख्या असतात.  रंगबेरंगी रंगानी, भरलेल्या स्वप्नांनी ओतप्रोत ओसांडून वाहतात! असो, आज लीना काय मी काय दोघीही सुसंपन्न स्थितीत आहोत, आमच्या करियर चा आलेख वाढता आहे.

अजूनही आमची नाती पक्की रेशीम धाग्यांनी बांधली गेलीत. त्याला फ्रेंडशिप डे ची वाट बघावी लागत नाही. गोष्ट छोटीशी होती पण दर नागपंचमी ला मन माहेरी धाव घेते ! फिरुनी बालपण पुन्हा जगावेसे वाटते. झिम्मा, फुगडी खेळून मंगळागौरी खेळात मिरवावे वाटते. पण या वेळेच्या गणिताचे करायचे काय? तर, असो! सांगावेसे वाटते इतकेच. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News