जिल्हाधिकारी म्हणतात, माझी मुलगी कलेक्टर नव्हे कलाकार होईल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

"पालकांच्या मनात, डोक्यात केवळ 'पीसीबी' आहे.
 

लातूर : "पालकांच्या मनात, डोक्यात केवळ 'पीसीबी' आहे. ते रात्रंदिवस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी करत बसतात. पण हे थोडे बाजूला ठेऊन मुलांना कलेचीही गोडी लावा. त्यामुळे व्यक्तिमत्व अधिक फुलते", असा सल्ला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पालकांना दिला. कलेक्टरचा मुलगा किंवा मुलगी कलेक्टरच झाली पाहिजे असे नाही. मी माझ्या मुलीला कलाकार बनवणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

आवर्तन प्रतिष्ठानच्या संगीत सभेच्या सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन जी. श्रीकांत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील युवा तबलावादक जगमित्र लिंगाडे यांना 'पं. शांताराम चिगरी युवा कलावंत पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या वेळी गायिका सावनी शेंडे, स्वागताध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, शल्यचिकित्सक डॉ. अजित जगताप, अभय शहा, प्रा. शशिकांत देशमुख, रविराज पोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जी श्रीकांत म्हणाले, "लातुरात वर्षाआड दुष्काळ असतो. पण शैक्षणिक दुष्काळ कधीही जाणवला नाही. शंभर पैकी शंभर गुण घेणारे अनेक विद्यार्थी लातुरातच आहेत. पण मुलांना कलेची जाण किती आहे? याचाही आपण पालक म्हणून विचार केला पाहिजे. मुलांना कलेची गोडी लावा. संगीत सभांना घेऊन जा. स्वर, नृत्यात ती रमली पाहिजे. त्यांना या कला कळल्या पाहिजेत. तर व्यक्तिमत्व संपन्न बनण्यास मदत होते."

सभागृहाचे काम प्रगतीपथावर
लातुरात सरकारी सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. ते लवकरच पूर्ण होईल. आवर्तनची 75वी मैफल नक्कीच नव्या सभागृहात होईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. लातुरात अनेक कलावंत आहेत. पण ते विखुरलेल्या स्थितीत आहेत. डिरेक्टरीच्या माध्यमातून ते एकत्र आणले जावेत. याचा पालकांनाही उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News