मुंबईच्या लोकांचा जीव फक्त 5 लाखांचा, हे पुन्हा सिद्ध झालं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • मृत्यूंच्या आकडेवारीनुसार 14 मृतांच्या घरच्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर त्यात जखमी झालेल्यांना 50 हजारांची रक्कम मिळणार असल्याचे  घोषित केले.

मुंबई - मुंबईमध्ये पुल कोसळणे, इमारत कोसळणे आणि लोकांचा मृत्यू होणे ही कोणतीच नवी गोष्ट नाही. मुंबईमध्ये एखादी दुर्घटना घडली की त्यात मृत पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर प्रशासनही या सगळ्या दुर्घटनांना सामोरे जाण्यास सक्षम असते.

मुंबईमध्ये एखादी दुर्घटना घडली की त्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या घरच्यांना 5 लाखांची मदत जाहीर केली जाते. काल झालेल्या केसरबाई-2 इमारत दुर्घटनेतसुध्दा हाच प्रकार घडला आहे.

सध्या आलेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनुसार 14 मृतांच्या घरच्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर त्यात जखमी झालेल्यांना 50 हजारांची रक्कम मिळणार असल्याचे घोषित केले. ही मुंबईतली पहिली घटना नाही, तर याआधीही अशा अनेक घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत, त्या प्रत्येक घटनेत मृत पावलेल्यांच्या घरच्यांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली, मात्र अशा घटना वारंवार होऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची कोणतीच माहिती अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे मुंबईच्या लोकांचा जीव फक्त 5 लाखांचा आहे का, हाच प्रश्न संतप्त नागरिकांमधून उठवला जात आहे.

डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून,  आठ जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्‍यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना घडली ती इमारत अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारा पथकाकड़ून ढिगारा हटविण्याचे काम अद्यापही सुरु होते.

या दुर्घटनेसंदर्भात आज (बुधवार) मंत्रालयात विशेष बैठक बोलावली असून, पालिकेच्या स्थायी समितिचिही विशेष बैठक होणार आहे. या बैठाकामधे काय निर्णय होणार याकड़े सर्वांच लक्ष लागले आहे. डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथील अब्दुल हमीद दर्ग्याशेजारी ही केसरबाई इमारत असून, त्याच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली ही इमारत आहे. तीन मजल्याच्या या इमारतीचा भाग सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. त्यामुळे परिसतात जोरदार आवाज झाला.

काही काळ स्थानिकांना काय झाले, हेच कळाले नाही. त्यामुळे अनेक जण घटनास्थळी दाखल झाले असता इमारतीचा भाग पत्त्यांच्या इमारतीसारखा खाली कोसळला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वेळ न दवडता स्थानिकांनीच मदतकार्याला सुरवात केली. तसेच पोलिस व अग्निशमन दलाला दूरध्वनी करून दुर्घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामन दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे दोन लहान मुलांना आणि एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यासह सात जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळावर आठ फायर इंजिन, एक क्‍यूआरव्ही, दोन रेस्क्‍यू व्हॅन, पाच रुग्णवाहिका, चार जेसीबी, चार डंपर पाचारण करण्यात आले होते. एनडीआरएफचेही 97 कर्मचारी व अग्निशमन दलाने मदतकार्य राबविले. आठ जखमींमध्ये दोन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. 

चिंचोळ्या रस्त्यांमुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत असून आणखी काही जण अडकल्याची शक्‍यता आहे. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्‍यता आहे. या इमारतीत पोटभाडेकरू राहत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना रहिवाशांबद्दल अधिक माहिती नसल्याचे दिसून आले. 

यापूर्वी या इमारतीच्या शेजारी असलेली मूळ केसरबाई इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यामुळे या इमारतीतील 53 कुटुंबीयांनी इमारत रिकामी केली होती. दुर्घटनाग्रस्त झालेल्या अनधिकृत इमारतीमधील दहा रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती. सध्या तेथे पोटभाडेकरू राहत होते. 

जखमींसाठी ग्रीन कॉरिडॉर 
दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या डोंगरी परिसरात एरवी प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे जखमींना तात्काळ रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी परिसरात ग्रीन कॉरिडॉर निर्माण केला होता. तसेच परिसरत अतिरिक्त वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. त्यासाठी जे. जे. पुलाखालून दक्षिणेकडील मार्गिका वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे एरवी दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आलेल्या जे. जे. उड्डाण पुलावरून दुचाकी वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News