१३ टक्‍क्‍यांनी घटला मुंबईचा निकाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • चार लाख ७३ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत
  • ​मुंबई विभागातही मुलींची बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल यंदा तब्बल १३.३७ टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदा मुंबई विभागाचा निकाल ७७.४ टक्के लागला आहे. यंदाही निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. या निकालात मुंबई विभागातील ५७ हजार २८४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून १६ लाख ३९ हजार ८६२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्य मंडळाचा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालामध्ये १२.३१ टक्‍यांनी घट झाली आहे. राज्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन लाख ९० हजार ६२ विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे; तर सर्वाधिक चार लाख ७३ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, तसेच तीन लाख ८५ हजार ४०१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ९९ हजार ९२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई विभागातही मुलींची बाजी
मुंबई विभागातून तीन लाख ५७ हजार ५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये एक लाख ८९ हजार ११७ मुले आणि एक लाख ६७ हजार ९३८ मुलींचा समावेश आहे. यापैकी दोन लाख ७५ हजार ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये एक लाख ३७ हजार १०६ मुले आणि एक लाख ३७ हजार ९६५ मुली आहेत. मुलांचा निकाल ७२.५० टक्के आणि मुलींचा निकाल ८२.१५ टक्के लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News