ईडीला पवारांची धास्ती,"चौकशीची गरज नाही आणि भासणारही नाही"म्हणत पाठवले पत्र
आज, स्वतः शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पोलिसांनी पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाऊ नका, अशी दोन वेळा विनंती केली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. आज, स्वतः शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार असल्याचे जाहीर केले होते. पण, पोलिसांनी पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाऊ नका, अशी दोन वेळा विनंती केली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ईडी सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. दुसरीकडे राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल झाले. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून, पोलिसांनी ईडीच्या कार्यालय परिसरात जमावबंदी आदेश जारी केला. दुसरीकडे पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवला होता. ईडी कार्यालय परिसरात ड्रोनच्या साह्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवली जात होती.
पोलिसांकडून मनधरणी
कोणत्याही परिस्थितीत ईडी कार्यालयात जाणार, अशी भूमिका घेतलेल्या पवारांची मुंबई पोलिसांनी सकाळपासून दोन वेळा मनधरणी केली. ईडी कार्यालय परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपण ईडी कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी सकाळी शरद पवार यांना केले होते. त्यानंतर ईडीने ‘तुमच्या चौकशीची सध्या गरज नाही, भविष्यातही गरज भासणार नाही,’ असे पत्र पवार यांना पाठविले. पण, हे पत्र पवार यांनी स्वीकारले नाही.
ईडी कार्यालयाला भेट देण्यावर पवार आणि राष्ट्रवादीचे नेते ठाम असल्यामुळे पोलिसांनी दुसऱ्यांदा पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी स्वतः पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांना ईडी कार्यालयात न जाण्याचे आवाहन केले. पण, पवार आणि त्यांचे नेते तेथे जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधून, पवार आणि नेते ईडी कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.