प्रदूषणमुक्त भारतासाठी तरूणांची मुंबई ते कन्याकुमारी सायकलस्वारी

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

पुण्याच्या सात युवकांनी ११ दिवसांत पूर्ण केला १७६० किलोमीटरचा प्रवास; प्रवासात ठिकठिकाणी जनजागृती केली. २५ ऑक्‍टोबरला मुंबईतून सुरू केलेला प्रवास ४ नोव्हेंबरला कन्याकुमारी येथे पूर्ण झाला. दररोज साधारण १५० कि.मी.चा प्रवास करून ११ व्या दिवशी सातही जण कन्याकुमारीला दाखल झाले.

मुंबई : देशात वाढत जाणारी प्रदूषणाची समस्या, त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विविध आजारांचा परिणाम नागरिकांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्या अनुषंगाने ‘प्रदूषणमुक्त भारता’चा संदेश देण्यासाठी मुंबई व पुण्यातील सात युवकांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १,७६० कि.मी.चा प्रवास सायकलने नुकताच पूर्ण केला आहे.

सतीश जाधव, सोपान नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दीपक निचित, लक्ष्मण जगताप आणि अभिजित गुंजाळ हे मुंबई व पुण्यातील सात युवक प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्याच्या हेतूने एकत्र आले. आतापर्यंत कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. या वर्षी निसर्गासोबत साजरी करायची, असा विचार करून त्यांनी मुंबई ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलने करण्याचा निर्णय घेतला.

२५ ऑक्‍टोबरला मुंबईतून सुरू केलेला प्रवास ४ नोव्हेंबरला कन्याकुमारी येथे पूर्ण झाला. दररोज साधारण १५० कि.मी.चा प्रवास करून ११ व्या दिवशी सातही जण कन्याकुमारीला दाखल झाले. वाटेत खंडाळा, कात्रज व खंबाटकी घाटासह दक्षिण भारतातील अनेक घाट लागणार होते.

प्रवासात सायकल पंक्‍चर होणे, तार तुटणे, कडक ऊन, विरुद्ध दिशेचे जोरदार वारे, अधूनमधून कोसळणारा मुसळधार पाऊस, हवामान खात्याने सूचित केलेले वादळ, महामार्गावरील भरधाव वाहनांची वर्दळ अशा अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी मोहीम पूर्ण केली. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, संकेश्‍वर, धारवाड, दावनगिरी, सिरा, बंगळूर, सेलेम, दिंडीगुल, कोवीलपट्टी आणि कन्याकुमारी अशा प्रवासात त्यांना शालेय विद्यार्थी, सरकारी अधिकारी, पोलिसांचे सहकार्य लाभल्याचे सतीश 
जाधव यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News