मुंबईवर आता तापाचे संकट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • साथीच्या रोगांबरोबरच गल्लोगल्ली मलेरिया आणि डेंगीचे रुग्ण

मुंबई - दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपून काढल्यावर आता साथीच्या रोगांचे संकट डोके वर काढू लागले आहे. झोपडपट्टी परिसरात सखल  भागांत साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया व डेंगीचे प्रमाण वाढू लागले आहे. आता लेप्टो व स्वाईन फ्लूचे रुग्णही वाढू लागतील, अशी भीती डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. पालिका दवाखाने आणि रुग्णालयांत रुग्ण वाढू लागले असून प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत साचून राहिलेल्या पाण्यात, बंदिस्त गटारांमध्ये आणि प्रवाही नसलेल्या पाण्यात डासांची पैदास झपाट्याने होत आहे. नाल्यांवर आणि साचलेल्या पाण्यात धूर वा औषधांची फवारणी होत नसल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांसह इमारतींमध्येही साथीचे आजार बळावत चालले असल्याचे दिसून येत आहे. 

उपचारांसाठी डॉक्‍टरांकडे जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. पालिकेच्या मुख्य आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये तापाने फणफणलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सकाळी बाह्य रुग्ण विभागात तापाच्या रुग्णांची भलीमोठी रांग लागल्याचे दिसून येत आहे. यंदाही डेंगीच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीइतकीच होत आली आहे. त्यामुळे मुंबईत डेंगीचे भय वाढले आहे. सध्याचे वातावरण आजारांना पोषक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

४० टक्के रुग्ण व्हायरल तापाचे
श्‍वसनाच्या तक्रारींसह येत्या आठवड्याभरात स्वाईन फ्लू आणि लेप्टोचे रुग्णही मोठ्या संख्येने वाढतील, अशी भीती डॉक्‍टरांकडून व्यक्त केली जात आहे. बराच काळ दूषित पाण्यातून प्रवास केल्याने दोन दिवसांत व्हायरल ताप आणि श्‍वसनाची तक्रार घेऊन दर दिवसाला ४० टक्के रुग्ण येत असल्याची माहिती मुंबई सेंट्रलमधील मेडिसीन विभागाचे डॉ. बेहराम पार्डिवाला यांनी दिली. गेल्या आठवड्यापासून वीकेण्डला होणाऱ्या पावसाने मुंबईकरांमध्ये रोगराईही वाढत असल्याचे ते म्हणाले. दहा दिवसांपासून आम्हाला लेप्टो आणि डेंगीचे दोन व मलेरियाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. कित्येक रुग्णांमध्ये स्वाईन फ्लूसदृश लक्षणे आहेत. अशा रुग्णांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इंजेक्‍शने घ्यावीत, असा सल्ला डॉ. पार्डिवाला यांनी दिला. 

स्त्यांवरचे अन्न-पाणी बाधू लागले
मुंबईत रस्त्यांवर विकले जाणारे अन्नपदार्थ, सोबत दिले जाणारे पाणी, सरबत आणि फळांच्या रसामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांवर विकले जाणारे अन्नपदार्थ, सरबत आणि इतर पेये टाळा. पाणी उकळून आणि गाळून प्या, असे आवाहन पालिकेने केले आहे.

काय करावे 

  • उकळलेले पाणी प्या
  • उघड्यावरचे अन्नपदार्थ आणि पेय टाळा
  • अंगदुखी आणि तापासारखे वाटल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे उपचार सुरू  करा
  •  पावसाच्या पाण्यातून चालल्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा
  •  पालेभाज्या कमी खा
  •  ताप अंगावर काढू नका
  •  डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा
  •  कपडे ओले ठेवू नका 

मुंबईत पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मात्र, ते आटोक्‍यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली जात आहेत. नागरिकांनी तुंबलेल्या पाण्यातून जाऊ नये. तुंबलेल्या पाण्यात जनावरांचे मलमूत्र मिसळले असल्यास पायाच्या जखमांमधून लेप्टोचा संसर्ग होण्याचा धोका असतो. ताप अंगावर काढू नये. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. सतत ताप येत असल्यास पालिकेच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी.
- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News