मुंबई : पालिकेच्या ६१ हजार विद्यार्थ्यांची ‘एस्सेल वर्ल्ड टूर’!

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 18 November 2019

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी दरवर्षी सहल आयोजित होते. यासाठी होणाऱ्या खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सहल निघणार आहे. यात आपल्या पाल्यास सहभागी करायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार पालकांना असेल. 
- महेश पालकर,
शिक्षणाधिकारी, महापालिका.

मुंबई :  महापालिकेच्या शैक्षणिक सहल उपक्रमांतर्गत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची यंदा बोरिवलीतील एस्सेल वर्ल्ड येथे सहल जाणार आहे. पालिका शाळेतील ६१ हजार विद्यार्थी सहलीत सहभागी होतील. यासाठी तीन कोटी ५० लाख ७५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. सहलीत विद्यार्थ्याने सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय पालकांवर सोपवण्यात आला आहे. 

महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. या सहलीत प्राथमिक शाळेतील चौथीचे, उच्च प्राथमिक शाळेतील चौथी आणि सातवीचे तर जुनी माध्यमिक शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून एक दिवसाकरिता शाळांना ही सहल काढता येणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० असे वेळेचे बंधनही आहे. सहलीत विद्यार्थ्यांना अल्पोपाहार, जेवण, विमा व वाहतूक व्यवस्था पुरवली जाईल. 
चौथी, सातवीचे ५९ हजार ६०० विद्यार्थी या सहलीत सहभागी होतील. यासाठी प्रति विद्यार्थी ५७५ रुपये खर्च अपेक्षित आहे.

या सर्व विद्यार्थ्यांकरिता ३ कोटी ४२ लाख ७० हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे. सातवीच्या १ हजार ४०० विद्यार्थ्यांसाठी ८ लाख ५ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. असे एकूण ६१ हजार विद्यार्थी या सहलीत सहभागी होणार असून त्यांच्या सहलीवर होणाऱ्या ३ कोटी ५० लाख ७५ हजार खर्चाला पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 
  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News