मुंबईत एफवायचा कट ऑफ घसरला, नामांकित महाविद्यालयही झाली फूल्ल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

मुंबई विद्यापीठाशी संलग्न प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी  सायंकाळी जाहीर झाली.

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्न प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी  सायंकाळी जाहीर झाली. या यादीत केंद्रीय आणि एचएससी मंडळांच्या विद्यार्थ्यांत मोठी स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे. पहिली गुणवत्ता यादी ९५ टक्केपर्यंत आली होती. मात्र, दुसऱ्या यादीत अनेक नामांकित महाविद्यालयांतील जागा फुल्ल झाल्या असल्याने अशा महाविद्यालयात तिसरी यादी जाहीर होणारच नाही अशी स्थिती आहे. ही यादी पहिल्या यादीपेक्षा दोन ते तीन टक्‍यांनी घटली आहे.

केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने याचा परिणाम या यादीवरही दिसून आला. त्यामुळे कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची वाट पाहवी लागणार आहे. बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी, बीएएफ (बॅफ), बीबीआय, बीएससी (कॉम्प्युटर सायन्स), बीकॉम (बॅंकिंग ॲण्ड इन्शुरन्स), बीकॉम अशा सर्व पारंपरिक व सेल्फ फायनान्सच्या शाखांमध्ये प्रवेश घेण्याचा कल वाढल्याने या अभ्यासक्रमाची टक्केवारी ७० पासून ते ९० च्या आसपास दुसऱ्या यादीत पोहोचलेली आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क २१, २२ आणि २४ जूनपर्यंत भरता येणार आहे. त्यानंतर तृतीय आणि अंतिम गुणवत्ता यादी २४ जून रोजी जाहीर होणार आहे.

‘वैद्यकीय’साठी मराठा आरक्षण लागू 
विधानसभेने संमत केल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याबाबतचे विधेयक शक्रवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू केला. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. सरकारने  विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. राज्य सरकारने या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते गुरुवारी विधानसभेत  मांडले होते.

परीक्षेला बसूनही गुणपत्रिकेवर गैरहजर
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या टीवाय बीएस्सी सत्र सहाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर गैरहजर शेरा असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बीएसस्सी परीक्षा आठ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी दिली होती. यापैकी तीन हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल ५० टक्‍क्‍यांहून कमी लागला आहे. ३० दिवसांत निकाल लावण्याच्या अट्टहासापायी विद्यापीठ अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. हा निकाल विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News