'ती' कसरती करत बनली अनाथांची आई

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • शांताबाई पवार यांचे वय ८५ वर्षे. त्या हडपसरमधील गोसावीवस्तीमध्ये राहतात. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर संकट कोसळले

हडपसर - शांताबाई पवार यांचे वय ८५ वर्षे. त्या हडपसरमधील गोसावीवस्तीमध्ये राहतात. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर संकट कोसळले. सहा मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. यातूनच संसाराचा गाडा ओढण्यासाठी व चार पैशांसाठी त्यांनी जिद्दीने साहसी कसरती सादर करायला सुरवात केली. या खेळातून मिळालेल्या पैशातून त्या संसाराचा गाडा या वयातही हाकीत आहेत. तसेच दहा अनाथ मुलांची जबाबदारी त्या हिमतीने सांभाळत आहेत. त्यांचा जीवन प्रवास धडधाकट लोकांसाठीही प्रेरणादायी आहे

शांताबाई यांनी वयाच्या ९ व्या वर्षी खेळ करायला सुरवात केली. या कलेचा वारसा लाभलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. लग्न होईपर्यंत आई-वडिलांसोबत त्यांनी खूप ठिकाणी खेळ केले. लग्नानंतर त्यांचा खेळ सुटला. पुढे त्यांचा पतीचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी शांताबाईंवर पडली. त्यातूनच पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत. तसेच या कलेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मुलांना स्वतःच्या पायांवर उभे केले. त्यांची नातवंडेदेखील त्यांना या खेळात मदत करत आहेत. उतारवयातदेखील त्या शहरात व विविध गावांत आपला खेळ सादर करत आहेत. 

शांताबाई केवळ दुसरी शिकलेल्या आहेत. त्या लेझीम आणि दांडपट्टा असे खेळही सादर करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी आज या खेळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून १० अनाथ मुलांना आधार दिला आहे. विशेष बाब म्हणजे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांतूनही आपली कला सादर केली आहे. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह त्याच्यात दिसतो. शांताबाई यांची कहाणी प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. खेळाने त्यांना आधार दिला. त्यातूनच त्या अनाथ मुलांना आधार देत आहे. आत्मविश्‍वास आणि ऊर्जा असेल तर आयुष्यात आपण खूप काही करू शकतो हे शांताबाईंचा जीवन प्रवासातून समजते.

शांताबाई ‘सकाळ’शी बोलताना म्हणाल्या, की जगणे किंवा मरणे आपल्या हातात नसते. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही व्यासपीठावर कला सादर करण्याची मी संधी साधते. सिनेमांमध्ये काम करताना वेगळा अनुभव मिळाला. डोंबारी खेळ करण्याच्या कलेसोबत गाणी म्हणणे हा देखील माझा छंद आहे. डोंबारी समाजातील बहुतांश लोकांना जन्माचे गाव नाही, घराचा पत्ता नाही, मतदान नाही, आधार नाही, रहिवासी नाही, शिक्षण नाही अशी अवस्था आहे. भटक्‍या जमातींपैकी एक असलेल्या ‘डोंबारी’ समाजाची दखल शासनाने घ्यायला हवी.
- शांताबाई पवार

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News