आई, मले शाळेला जाऊ देणं वं; चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • बालगोपालांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा श्रीगणेशा; चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा
  • शाळेचा पहिला दिवस. लहान-लहान गोजिरी मुले शाळेकडे येत होती. दैनिक सकाळने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प दिले. हातात फुल घेऊन ‘थॅक्यू सर’ असं बोबड्या बोलाने त्यांनी स्वागत स्वीकारले. सकाळच्या या उपक्रमाचे शाळा समिती, शिक्षक आणि पालकवर्गाकडून मोठे कौतुक.

अकोला : सलग दीड-दोन महिन्यांच्या सुटीतील मौजमजेनंतर आज दिवस उजाडला तो शाळा प्रवेशाचा. आकर्षक आणि मनोरंजनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे आत्ताची पिढी शाळेची आवर्जून वाट पाहते. पालकांना नवनवीन वस्तूंची मागणी करत भांडावून सोडतात. शाळेचा पहिला दिवस आता रडण्याने नव्हे तर हसत खेळत होत असल्याने ‘आई मला शाळेला जाऊ दे, जाऊ देणं वं’ म्हणतच लहानग्यांनी बुधवारी आपली शाळा गाठली.

 नवा गणवेश, नवा वर्ग, नवीन छत्री, नवीन दप्तरे, पाटी पेन्सिल, वॉटरबॅग, नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन शिक्षक, नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी बुधवारी शाळेची पहिली घंटा वाजली. अन्‌ बाळगोपाळांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा ‘श्रीगणेशा’ झाला. शाळांचा पहिला दिवस मुलांच्या किलबिलाटाने चांगलाच गजबजला.

शेकडो चिमुकली पावले. कुणी हसत हसत, तर कुणी रडत पडत शाळेची पहिली पायरी चढले. वर्गात नानाविध खेळण्याचा पसारा आणि खाऊचीही रेलचेल पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी आपल्या आईवडिलांसह रडत रडत शाळेच्या बाकावर ही चिमुकली स्थिरावली. तर शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण आणि ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला.

दीड महिन्यांच्या सुटीनंतर इंग्रजी शाळांचे प्रवेशद्वार बुधवारी उघडण्यात आले. बहुतांश शाळा परिसरात सुटी संपण्याआधीच स्वच्छता अभियान राबवत वर्ग, आवार चकाचक करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. मात्र, चिमुकले अजून बावरलेले होतेच. नव्याची नवलाई असली तरी पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांना सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आईवडिलांना काही केल्या सोडवत नव्हते. विद्यार्थ्यांनी नवीन मित्रांच्या संगतीने शाळेतला पहिला दिवस घालवला; तर काही मुले नवीन वर्गातील आपला बाक ठरविण्यासाठी धडपडत होते.

नवीन वर्गातील नवीन वर्गशिक्षक आणि नवीन सजावटीची उत्सुकता या विद्यार्थ्यांनी अनुभवली. नवीन वर्गात आपला ‘बॅचमेट’ कोण, याविषयी मुलांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News