मोदींकडून आचारसंहितेचा भंग? : माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • आचारसंहिता भंगाची माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांकडून झालेल्या कथित आचारसंहिता भंगाच्या घटना आणि त्यांना देण्यात आलेली ‘क्‍लीन चिट’ आदींची माहिती देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज स्पष्ट नकार दिला.

याबाबतच्या माहितीचे एकत्रीकरण करण्यासाठी आयोगाकडे असलेल्या स्रोतांचा अपव्यय होईल, असे कारण आयोगाने दिले आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत (आरटीआय) निवडणूक आयोगाकडून ही माहिती मागविण्यात आली होती.

पंतप्रधान मोदींकडून झालेल्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांमध्ये त्यांना आयोगाकडून क्‍लीन चिट देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय एकमताने झाला नव्हता, तर त्या वेळी एका आयुक्तांनी विरोधी मते मांडली होती. याबाबतची माहिती देण्यासही आयोगाकडून नकार देण्यात आला.

पीटीआयच्या पत्रकाराने आरटीआयद्वारे आयोगाकडून ही माहिती मागितली होती. आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी विभागीय पातळीवर निकाली काढण्यात आल्या होत्या. याबाबतची एकत्रित माहिती उपलब्ध नाही. तसेच, अशा प्रकारच्या माहितीचे एकत्रीकरण करणे, हा आयोगाकडे असलेल्या स्रोतांचा अपव्यय ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News