मोदी सरकार आता अब की बार ‘रोजगार’चा नारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • कॅबिनेट समित्यांची स्थापना; मातब्बर मंत्र्यांचा समावेश

नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या समित्यांमध्ये ‘टीम मोदी’मधील मातब्बर मंत्र्यांचाही समावेश आहे.

गुंतवणूक आणि विकासदर वाढीसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा समावेश आहे.

कौशल्य विकास आणि रोजगारवाढीसाठी आणखी एक दहा सदस्यांची कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये शहा, सीतारामन आणि गोयल यांच्यासह कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल्य आणि उद्यमशीलता खात्याचे मंत्री महेंद्रनाथ पांडे, कामगार मंत्रालयाचे राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांचाही समावेश आहे.

विकासदर मंदावला
काही दिवसांत आर्थिक विकासदराचे चक्र मंदीच्या गाळात रुतल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न हे ५.८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले होते. उत्पादनक्षेत्राची वाढ मंदावल्याने रोजगार निर्मितीही ठप्प झाली असून, याचा परिणाम एकूण आर्थिक विकासावर होतो आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News