मोदींनी सामान्य जनतेला फसवले : काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

स्वतंत्र आणि कुठलीही कटकट नसलेली अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले असून, त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे

नवी दिल्ली : स्वतंत्र आणि कुठलीही कटकट नसलेली अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले असून, त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत काँग्रेसकडून आज सरकारवर टीकास्त्र डागण्यात आले. 

‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. एस. सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर आज हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. सिद्धार्थ यांचा मृत्यू प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या छळामुळे झाला असल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  

काँग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे, की दुसऱ्यांदा निवडणूक आल्यानंतर देशातील नागरिकांचे लक्ष्य दुसरीकडे वळविण्यासाठी बहुसंख्यकवाद, अल्पसंख्यकवाद, काश्‍मीर, पाकिस्तान, मुस्लिम महिला, राम आणि त्याचबरोबर मॅन व्हर्सेस वाईल्ड आदी गोष्टींचा मोदी हे आधार घेत आहेत. बेरोजगारी वाढते आहे, अर्थव्यवस्था ढासळते आहे, शेतकरी आत्महत्या करीत आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.

रंगनाथन हंगामी अध्यक्ष
कॅफे कॉफी डे कंपनीच्या (सीसीडी) अंतरिम अध्यक्षपदी एस. व्ही. रंगनाथन यांची आज नियुक्ती करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाची आठ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रंगनाथन हे सध्या कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. नितीन बागमने यांची हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देशाचे भविष्य उद्‌ध्वस्त करू नका : ममता
सिद्धार्थ यांचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडून त्यांचा छळ केला जात होता, असे दिसून येते. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, असे त्यांच्या पत्रातून दिसून येते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

देशातील उद्योगांचे प्रमुख सध्या प्रचंड तणावाखाली जगत आहेत. सरकारकडून सुरू असलेला घोडेबाजार आणि राजकीय सूडापोटी होत असलेल्या कारवाईमुळे अनेक उद्योजकांनी देश सोडला असून, आणखी काही जण देशाबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. राजकीय सूडापोटी होणाऱ्या कारवायांमुळे देशाचे भविष्य उद्‌ध्वस्त होत आहे, हे केंद्र सरकारने ध्यानात घ्यावे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News