मनसेकडून पंतप्रधानांना १० हजार पोस्टकार्ड पाठवण्यास सुरुवात; व्हिडीओ पाहा..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनसे वेगवेगळ्या माध्यमातून मोहीम राबवत आहे. 
  • गजानन काळे यांनी कार्यकर्त्यांसह पोस्टपेटीत पोस्टकार्ड वाटपाला सुरुवात केली.

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनसे पुन्हा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्टकार्ड पाठविण्याच्या मोहिमेला नवी मुंबई मनसेतर्फे सुरुवात करण्यात आली. यावेळी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी कार्यकर्त्यांसह पोस्टपेटीत पोस्टकार्ड पाठविण्यास सुरुवात केली. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मनसे वेगवेगळ्या माध्यमातून मोहीम राबवत आहे. 

 

तमिळसह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग मराठीला का नाही? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

 

पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत, मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचविणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ‘#अभिजात भाषा मराठी' असा हॅशटॅग वापरून सोशल मोहीम सुरु केली असून या मोहिमेला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आवाहन काळे यांनी केले आहे. अनेकांनी ट्विटर, फेसबुकवर, #Abhijatbhashamarathi, #अभिजाता भाषा मराठी असा हॅशटॅग वापरला आहे. मनसे अधिकृतसह मनसे नेते, पदाधिकारी, समर्थकांसह नेटकरयांनी त्यांच्या अकाऊंटद्वारे या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. यासोबतच आता पोस्टकार्ड मोहिमेला देखील मनसेनं उचलून धरल्याने यायाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका घेणार? हे पाहून महत्वपूर्ण ठरणार आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News