मनसेच विधानसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, इतर पक्षांचे गणित फिस्कटणार ?

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 20 August 2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र की आघाडीसोबत याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, मनसेचे इंजिन निवडणुकीच्या रिंगणात धावणार असल्यामुळे, गेल्या साडेचार वर्षांत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या व आता युती करणाऱ्या भाजप - शिवसेनेच्या उमेदवारांची गणिते महानगरातील अनेक मतदारसंघांत बिघडण्याची चिन्हे आहेत. 

"ईव्हीएम' ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करीत ठाकरे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मांडली होती. मात्र, ती भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या पचनी पडली नाही. त्यातच मनसेत जे थोडे फार कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत, त्यांच्यातील लढण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढला. त्यामुळे, मनसेने निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. 

कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त भागाचा दौरा ठाकरे करणार होते, मात्र "ईडी'ने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली. त्यातून नक्की काय निष्पन्न होईल ते होवो, परंतु, त्याचा फायदा मनसे निवडणूक प्रचारात निश्‍चित उठविणार यात शंका नाही. विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याच्या आरोपाची झोड या निवडणुकीत उठणार आहे. त्यासाठी मनसेची रणनितीही ठरत आहे. त्यातच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेही त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. 

'लाव रे तो व्हिडिओ' 
'लाव रे तो व्हिडिओ' असे सांगत मोदी सरकारवर थेट हल्ला चढविण्याची ठाकरे शैली लोकसभा निवडणुकीत धुमाकूळ घालून गेली. दृकश्राव्य माध्यमांचा परिणामकारक वापर करण्याचे प्रचाराचे वेगळे तंत्र त्यांनी हाताळले. त्याचे मतांत किती परिवर्तन झाले, हा सत्ताधाऱ्यांचा मुद्दा असला, तरी त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे बुरखे फाडण्यात ठाकरे यांना यश आले. त्याची देशपातळीवर दखल घेतली गेली. त्यामुळे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्यासाठी कॉंग्रेसही राजी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मनसेच्या सोबत आहेच. त्यांची ताकद असलेली क्षेत्रेही वेगवेगळी असल्यामुळे, त्यांच्यात आघाडी होण्यात फारशी अडचण नाही. 

मनसेने विधानसभेत 2009 मध्ये तेरा जागा जिंकत दिमाखात प्रवेश केला. संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष, तसेच निर्णयाबाबत धरसोडीची वृत्ती यांमुळे मनसेचे 2014 मध्ये "पानिपत' झाले. अनेक सहकारी सोडून गेले. त्यानंतर संघटना आक्रसत गेली. त्यांचा निवडून आलेला एकमेव आमदारही शिवसेनेत गेला. याची जाणीव झाल्याने, गेल्या सहा-आठ महिन्यात मनसेने पक्षात शिल्लक असलेल्यांशी संवाद साधत संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले. 

मनसेचा रोडमॅप 
मनसेच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, 63 मतदारसंघांत त्यांची निश्‍चित अशी ताकद आहे. त्या मतदारसंघाच्या निवडणुकीवर ते परिणाम करू शकतात. त्यापैकी किमान 25 मतदारसंघांत विजयासाठी निकराची लढत देण्याची त्यांची ताकद आहे. या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी ठरविले आहे. 

मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यांत मनसेच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. या भागात गेल्यावेळी भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले होते. यावेळी युतीमुळे तेथे विद्यमान आमदारांना, किंवा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. तेथे गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांकडून त्यांच्याविरुद्घ जिंकलेल्या विरोधकाचा प्रचार होण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे ते कार्यकर्ते मनसेची ताकद यावेळी वाढवू शकतात. त्याचा निश्‍चित परिणाम यावेळच्या निवडणुकीत दिसून येईल. 

विदर्भ, मराठवाडा येथील काही मतदारसंघांत मनसेचे कार्यकर्ते स्वतःचे बळ राखून आहेत. त्यांच्या स्थानिक ताकदीचा वापर करीत या दोन विभागात यंदा मनसेचे इंजिन पळविण्याचा प्रयत्न होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा फटका जसा कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला बसणार आहे, तसाच फटका भाजप-शिवसेना युतीला मनसेच्या उमेदवारांमुळे काही मतदारसंघांत बसणार आहे. 

मनसे आघाडीत की स्वतंत्र 
कॉंग्रेस व राष्ट्रवादीतून नेते मोठ्या संख्येने युतीच्या पक्षात जाऊ लागले आहेत, की त्यांना सर्व मतदारसंघांत लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवार तरी शिल्लक राहणार का, असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे, त्यांच्या आघाडीत ते मनसेला स्थान देणार का, हा तसा अवघड प्रश्‍न सध्यातरी नाही. हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 120 जागा लढतील, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे, किमान पन्नास जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी त्यांनी केली आहे. 

त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह काही स्थानिक पक्ष आहेत. त्यामुळे, मनसेला या आघाडीत दहा-पंधरा जागा मिळू शकतील. मनसे मागत असलेले मतदारसंघ हे मुख्यत्वे कॉंग्रेसने गेल्या वेळी लढविलेले आहेत. त्यामुळे चर्चेत ती कोंडी फुटू शकते. परंतु, मनसे स्वतंत्र लढल्याचा फायदा आघाडीला होईल, की त्यांना आघाडीत घेऊन राज ठाकरे यांच्या प्रचाराचा सत्ताधारी विरोधी वातावरण निर्मितीसाठी उपयोग करून घ्यायचा, याचा निर्णय कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या धुरीणांना करावा लागेल. 

भाजप-शिवसेना युतीचे जागा वाटप झाल्यानंतरच निवडणुकीचे चित्र थोडे स्पष्ट होईल. त्यानंतरच आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. युतीचे जागा वाटप झाल्यानंतर, तेथील नाराज नेते अन्य पक्षांत आसरा शोधू लागतील. शिवसेनेतील अशा काही नेत्यांना मनसेशी जुळवून घेणे सोईस्कर ठरेल. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात या घडामोडी घडतील. सध्या तरी मनसेने बहिष्काराचा निर्णय मागे घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने मनसैनिकांत हुरुप आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News