राज ठाकरे ईडीच्या निशाण्यावर, लवकरच बजावणार समन्स

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 1 August 2019

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते ईडीच्या टार्गेटवर आहेत. अशातच राज ठाकरे यांचंही नाव या यादीत आलं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत सत्ताधा-यांना दणका देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठी आता ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ लागणार आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. येणा-या आठवड्यात हा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कोहिनूर मिल क्रमांक ३ विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत.

राज ठाकरे यांनी नुकतेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी वोटींग मशिन विरोधात नवी दिल्ली येथे निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन बॅलेटपेपरद्वारेच मतदान झाले पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच ईव्हीएम मशीन विरोधात ते मोर्चाही काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी विरोधात प्रचार करुनही भाजपा-शिवसेना युतीला कोणताही फटका बसला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात. यामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना सरकारविरोधात बोलू नये आणि दबावात राहावे यासाठीच ही कारवाई केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना वारंवार ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल आणि तासनतास प्रतिक्षा करत बसवून ठेवण्यात येईल.

ईडी आणि गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि ८६० कोटींच्या गुंतवणुकीचा तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. ही कंपनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी याने सुरु केली होती. याआधी ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकारी यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता राज ठाकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News