विखे भाजपात जाणार पण एकटे नाही; विखेंसोबत 10 आमदार होणार भाजपवासी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • विखे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित
  • विखेंसोबत भाजपवासी होऊ पाहणारे हे 10 आमदार कोण ?
  • विखेंच्या भाजप्रवेशाचा मुहूर्त कधी

काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून, आपण आणि सोबत दहा आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आमदार अब्दुल सत्तार यांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.

मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने नगर दक्षिणमधून लोकसभेचं तिकीट न दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज झाले होते. राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी आणि पर्यायाने सुजय विखेंसाठी सोडण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडीविरोधात जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. किंबहुना, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधातही नाराजी बोलून दाखवली होती. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. फक्त विखेंच्या भाजप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो आणि त्यांच्यासोबत किती आमदार भाजपमध्ये सामील होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 विखेंसोबत भाजपवासी होऊ पाहणारे हे 10 आमदार कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अब्दुल सत्तार हे दहापैकी एक आमदार असतील. मात्र, इतर 9 कोण असा प्रश्न आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे साताऱ्यातील आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. विकासकामांसाठी भेट असल्याचे गोरे यांनी सांगितली असली, तरी सद्यस्थिती पाहता, या भेटीवरुनही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News