‘जेडीएस’शी मैत्रीपुरे : सिद्धरामय्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019
  • राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मैत्रीमुळे काँग्रेसला लाभापेक्षा नुकसान अधिक

बंगळूर : राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मैत्रीमुळे काँग्रेसला लाभापेक्षा नुकसान अधिक झाल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली.

त्यानंतर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी, रोज ज्या वेदना सहन कराव्या लागत आहेत त्या व्यक्त करता येत नाहीत, असे म्हटले आहे. त्यावरून काँग्रेस- धजद युती सरकारमध्ये अद्यापही गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले.
सिद्धरामय्या गेले तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणुकीतील पराभव यावर प्रदीर्घ चर्चा केली.

राज्यात ‘जेडीएस’शी युती करून लाभापेक्षा पक्षाला नुकसानच अधिक झाल्याचे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. आता धजदचा सहवास पुरे झाला, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. 

इकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी, काँग्रेसबरोबर युती केल्याने रोज दु:खच वाट्याला आले आहे. ते कोणाकडे व्यक्त करण्याच्या मनःस्थितीत मी नाही, असे मत व्यक्त केले आहे. 

राज्यातील दुख, समस्या कमी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, परंतु त्या सोडविण्यात अडचणी आणण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे.

एकमेकांकडे बोट
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी वडील व जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात देवेगौडा यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील युती सरकार सुरळीत चालविण्यासाठी सिद्धरामय्या यांना दूर ठेवा, अशी सूचना केली होती. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी आज राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News