शेतीतील परिवर्तनाबद्दल दिल्लीत बैठक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 19 July 2019
  • सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत  चर्चा करण्यात आली.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

नवी दिल्ली : देशाच्या कृषिक्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषिक्षेत्रात खासगी गुंतवणुकीच्या शक्‍यता पडताळून पाहणे, ड्रोनसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विविध विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत  चर्चा करण्यात आली.

निती आयोगात झालेल्या या बैठकीला या समितीचे समन्वयक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसेच हरियाना, अरुणाचल प्रदेश, गुजरात आदी राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवला, तर उत्तर प्रदेशात विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या बैठकीस येऊ शकले नाहीत, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. 

यापुढील समितीची बैठक १६ ऑगस्टला मुंबईत होणार असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, की  कृषिक्षेत्रातील परिवर्तनाच्या संदर्भात राज्य सरकारांनी आपल्या कल्पना आणि सूचना ७ ऑगस्टपर्यंत कळवणे अपेक्षित आहे. खाद्यान्न आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात आवश्‍यक वस्तू कायद्याची गरज आहे का, असे विचारून ही तरतूद संपवण्याची सूचना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणे अन्न उद्योगाचा विकास दर वाढविणे, ‘फूड पार्क’ची परिणामकारकता तपासणे, कृषिक्षेत्रात केवळ तीन टक्के गुंतवणूक आहे ती वाढवणे त्यासाठी खासगी गुंतवणूकदारांना वाव देणे, कृषिक्षेत्रात ड्रोन वापर वाढविणे, शेतीतील तांत्रिक प्रगतीचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाही मिळावा, यासाठी प्रयत्न करणे आदी उपायांवरही आज विचारमंथन झाले.

१९९१ नंतर कृषिक्षेत्राचा विकासदर कमी झाला असून, सध्या बेसमेंट क्रेडिटचे प्रमाण कमी करण्यासाठी बॅंकांची मदत घेण्यावरच या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, यादृष्टीने काही ठोस योजनांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News