जाब विचारणाऱ्या मुलीचाच हात पिरगाळला, मुंबईच्या महापौरांचा प्रताप ! पहा व्हिडियो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019

सांताक्रूझ येथील दुर्घटनेनंतर मी त्या ठिकाणी गेलो होतो; मात्र त्यावेळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचाही विनयभंग केलेला नाही. राजकारणात असे आरोप होत असतात. मी कोणतीही दादागिरी केली नाही. माझ्यावरील हे आरोप निराधार आहेत. 

- विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापौर, मुंबई

मुंबई : अभियंत्याला धमकावल्यानंतर मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. सांताक्रूझ येथे समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या महापौरांनी गाऱ्हाणे मांडणाऱ्या मुलीचा हात पकडून पिरगळला. त्यानंतर त्यांनी तिला धमकावल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे महापौरांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, असे काहीच घडले नसल्याचा दावा महाडेश्‍वर यांनी केला आहे.  

‘ए, दादागिरी करू नकोस, तू ओळखत नाहीस मला’ अशा शब्दांत महापौर महाडेश्‍वर यांनी या मुलीला धमकावले. मुसळधार पावसात सांताक्रूझमधील पटेल नगर येथे विजेचा शॉक लागून आई-मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी पाश्‍चिम द्रुतगती मार्ग रोखून निषेध नोंदवला होता.

या पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी महापौर महाडेश्‍वर रविवारी पटेल नगर येथे आले होते. त्यावेळी संतप्त रहिवाशांनी त्यांना घेराव घालून ‘तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे काल का आला नाही’, अशी विचारणा केली. रहिवाशांच्या रोषामुळे स्तंभित झालेल्या महापौरांनी समोर येऊन प्रश्‍न विचारणाऱ्या मुलीचा हात पकडून पिरगळला आणि तिला धमकावले. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांचे उग्र रूप बघून त्यांनी काढता पाय घेतला.

विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गाऱ्हाणे सांगणाऱ्या मुलीचा हात धरून धमकी दिल्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यांना सत्तेचा माज चढल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी केली.

महाडेश्‍वर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले होते. त्याकडे लक्ष देण्यास महापालिकेला वेळ नाही. महापौर लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे औदार्यही दाखवू शकत नाहीत, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News