ग्रामविकासाचे धडे देणारे 'मावळा प्रतिष्ठान'

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथील सुमारे ५० तरुणांनी एकत्र येऊन समाजसेवेसाठी 'मावळा प्रतिष्ठान'ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सर्व युवक गेल्या चार वर्षांपासून ग्रामविकासाचे विधायक उपक्रम राबवीत आहेत. मुळशी धरण भागातून कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुळशी खुर्द हे पहिलेच गाव. या गावात पहिली ते चौथीपर्यंत शिकल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी माल्याच्या सेनापती बापट विद्यालयात येतात. त्यानंतर पौड, पिरंगुट किंवा पुण्याला जाऊन उच्च शिक्षण घेतात. याच गावातील प्रज्वल कानगुडे तरुणही एम.बी.ए. करून पुण्यात नोकरी करू लागला.

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथील सुमारे ५० तरुणांनी एकत्र येऊन समाजसेवेसाठी 'मावळा प्रतिष्ठान'ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे सर्व युवक गेल्या चार वर्षांपासून ग्रामविकासाचे विधायक उपक्रम राबवीत आहेत. मुळशी धरण भागातून कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुळशी खुर्द हे पहिलेच गाव. या गावात पहिली ते चौथीपर्यंत शिकल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी माल्याच्या सेनापती बापट विद्यालयात येतात. त्यानंतर पौड, पिरंगुट किंवा पुण्याला जाऊन उच्च शिक्षण घेतात. याच गावातील प्रज्वल कानगुडे तरुणही एम.बी.ए. करून पुण्यात नोकरी करू लागला. प्रज्वल कानगुडे याने गावातील युवकांना संघटित करून विधायक उपक्रम राबविण्याच्या हेतूने यासाठी पुढाकार घेतला.

२० ते ३० वयोगटातील सुमारे ५० युवकांना एकत्र केले. या सर्व युवकांनी ग्रामविकासासाठी विधायक उपक्रम सुरू करण्याच्या आणाभाका घेतल्या. प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सर्वानुमते प्रज्वल कानगुडे यांची निवड झाली. उपाध्यक्ष सागर वाघ, सचिव लालासाहेब ढमाले, खजिनदार विजय पासलकर, कार्यकारिणी सदस्य म्हणून कैलास ढमाले, संजय कानगुडे, योगेश कानगुडे, निवृत्ती कानगुडे, सुनील कानगुडे, सागर ढमाले यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीबरोबरच गावातील इतर युवकांची मिळून ५० जणांची वज्रमूठ संस्थेच्या माध्यमातून एकत्र आली.

या युवकांनी स्वतःच्या कमाईतील रक्कम गोळा केली. त्यातून सार्वजनिक वाचनालय सुरू केले. त्यात सर्व वर्तमानपत्रे येऊ लागली. वर्तमानपत्रे वाचण्याच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थांमध्ये घटनांच्या परामर्शाबद्दल चर्चा होऊ लागली. या युवकांनी गावातच वेगवेगळ्या मार्गाने जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावले. मुळशी खुर्दपासून कोकणच्या दिशेला ७० किलोमीटरपर्यंत रुग्णालयाची सुविधा नाही. अपघात घडल्यास किंवा कुणी आजारी पडल्यास त्याला वाहतुकीअभावी वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे युवकांनी रुग्णवाहिका सुरू करण्याचा विचार केला. हिंजवडीतील भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप साखरे यांनी या युवकांना मोफत रुग्णवाहिका दिली.

या युवकांनी नंतर उद्योजक मधुसूदन राठी यांची भेट घेऊन त्यांना रुग्णवाहिकेची संकल्पना समजावून सांगितली. राठी यांनी त्यांचा ट्रस्ट आणि रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलच्या माध्यमातून या रुग्णवाहिकेसाठी अडीच लाख रुपये दिले. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांसाठी मोफत वाहतूक सुविधा पुरविण्यात येत आहे. या युवकांनी क्‍लीन मुळशी, ग्रीन मुळशीचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी मधुसूदन राठी यांच्याच आर्थिक सहकार्यातून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीही घेतली. ही घंटागाडी दररोज मुळशी खुर्द, गोनवडी, ढोकळवाडी, माले कॅम्पपर्यंत जाऊन घराघरांतील कचरा मोफत गोळा करतात.

दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक आणि कौटुंबिक क्षमतेनुसार पुढील शिक्षणाची योग्य दिशा मिळावी, यासाठी हे युवक धरण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी माल्यामध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा घेतात. प्रतिष्ठानने माजी विद्यार्थी या नात्याने माल्याच्या सेनापती बापट विद्यालय आणि आयटीआयला रोटरी क्‍लब ऑफ पुणे सेंट्रलच्या सहकार्याने सुमारे ३५ लाखांची शालोपयोगी साहित्य दिले. त्यामुळे ही शाळा आता डिजिटल झाली आहे. मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक रामचंद्र दातीर यांची शैक्षणिक तळमळ आणि पाठपुराव्यामुळे सेनापती बापट विद्यालयातही भौतिक सुविधा देण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रज्वल कानगुडे यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News