आलमट्टीचे गणित सामान्यांना उलगडेना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • महापुराचेही राजकारण; पाणी सोडण्यावरून सामान्य माणूस संभ्रमात

कोल्हापूर - आलमट्टी धरणातून रोज इतके पाणी सोडल्याची शासकीय माहिती सोशल मीडियावरून व्हायरल होत होती. मात्र प्रत्यक्षात पाण्याची पातळी कमी होत नव्हती. त्यामुळे आलमट्टीमधून किती क्‍युसेक पाणी प्रत्यक्षात सोडले याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होता. याची चर्चाही सोशल मीडियावर होती. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राज्यातील सीमाभागातील पूरस्थितीचा आढावा प्रत्यक्ष तेथे जाऊन स्वतंत्रपणे घेतला.

२००५ साली महापुराने थैमान घातल्यावरही आलमट्टीतील विसर्ग कमी झाल्याने हा पूर आल्याचे सांगितले जात होते. यंदाही आलमट्टी धरणाचे नाव चर्चेत आले. आलमट्टी धरणातून तीन लाख क्‍युसेक विसर्ग झाला. दोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग आज करणार अशा स्वरूपाची शासकीय माहिती व्हायरल व्हायची. आलमट्टीचा विसर्ग झाला की सांगली, कोल्हापुरातील पुराच्या पाण्याची पातळी कमी होते. हे गणित सर्वसामान्य माणसाच्याही मनात २००५ च्या पुरानंतर पक्के बसले आहे. यंदा मात्र त्याच्यापर्यंत पाण्याचा विसर्ग झाल्याच्या बातम्या येत होत्या.

पण प्रत्यक्षात पाण्याची पातळी कमी होत नव्हती. नृसिंहवाडी आणि शिरोळ तालुक्‍यातील अन्य गावात पाण्याची पातळी स्थिर होती. त्यामुळे खरचं आलमट्टीमधून जाहीर केला तेवढा विसर्ग झाला आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावरून सुरू होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि येडियुराप्पा यांनी आपापल्या राज्यातील पूरबाधित भागाची पाहणी केली. यावेळी फडणवीस यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला जावा यासाठी कर्नाटकशी बोलणे झाल्याचे सांगितले. येडियुराप्पा यांनी पुराचा फटका बसू देणार नाही, असे आश्‍वासनही नागरिकांना दिले आहे. त्यामुळे पुन्हा विसर्गाच्या चर्चेला उधाण आले. आलमट्टीच्या विसर्गाचे गणित मात्र सामान्य माणसाला उलगडत नसल्याचे दिसते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News