मला भावलेली 'मास्तरांची सावली'

डॉ. मारोती कसाब
Monday, 14 October 2019
  • कवी म्हणून नारायण सुर्वे जगाला माहीत आहेत. त्यांनी काय लिहिले, हे सर्वज्ञात आहे; मात्र ते कसे जगले याचा शोध कृष्णाबाईंनी "मास्तरांची सावली" मधून घेतला आहे

    "मास्तरांची सावली" या पुस्तकाचे परीक्षण डॉ. मारोती कसाब यांनी केले आहे. सध्या अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून मराठी विभाग कार्यरत आहेत.  संपर्क  ९८२२६१६८५३

१५ ऑगस्ट २००९ रोजी वसईच्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेले कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जीवनसाथी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचे 'मास्तरांची सावली' हे स्वकथन तब्बल दहा वर्षांनी माझ्या हाती लागले. 

महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील कपाटात काही तरी शोधत असताना अचानक या पुस्तकावर नजर गेली आणि जवळ जवळ खसकन ओढूनच मी ते पुस्तक घेतले. यापूर्वी विद्यापीठीय अभ्यासक्रमात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या अनेक कविता अभ्यासल्या होत्या. 'ऐसा गा मी ब्रह्म' , 'माझे विद्यापीठ' , 'सनद' आणि 'सर्व सुर्वे' या पुस्तकांतून सुर्वे मास्तरांची कविता वाचून स्वतःलाच धन्य समजले होते. "कधी फाटका आत कधी फाटका बाहेर आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे.

ही कविता नुकत्याच मिसरुड फुटलेल्या ओठांवर तरळत होती. या कवितेतील 'फाटका' हा शब्द माझ्या फाटक्या आयुष्याचेच प्रतीक वाटत होते. ऐन तारुण्यात अशी या सूर्यकुळातील कविची सोबत जगायला बळ देत होती. पुढे बेकारीच्या काळात
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली" ही कविता विशेष भावली होती. 

परभणीच्या तुराब उल हक उरुसानिमित्त भरलेल्या त्रैभाषिक कविसंमेलनात" काय ते पत्रात लिवा" आणि 'मास्तर, तुमचंच नाव लिवा' आदी कविता स्वतः सुर्वे मास्तरांच्याच आवाजात ऐकलेल्या होत्या. एम. ए. ला असताना, औरंगाबादच्या मसाप सभागृहात त्यांना पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मिळाली होती. अशा या आपल्या आवडत्या कवीचे जीवन चरित्र समजून घ्यायला "मास्तरांची सावली" हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे, हे लक्षात घेऊन मी ते वाचायला घेतले. आणि खरोखरच आधुनिक काळातल्या या महाकवीचा जीवनपटच या पुस्तकातून उलगडला. 'नारायण गंगाराम सुर्वे' या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या लघुचित्रपटात नारायण सुर्वे यांच्या पत्नीची म्हणजेच कृष्णाबाईंची भूमिका वठवलेल्या नेहा सावंत यांनी या स्वकथनाचे अगत्याने मनःपूर्वक असे शब्दांकन केले आहे. 

अनिल दाभाडे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ अत्यंत समर्पक असून, शांत संयमी कृष्णाबाईंची छबी आणि संपूर्ण मुखपृष्ठ व्यापून उरलेले कविवर्य नारायण सुर्वे यांचे फिकट पण बोलके चित्र पुस्तकातील आशय गडद करणारे आहे. माणसातले माणूसपण जपण्यासाठी सतत धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांना हे पुस्तक कृष्णाबाईंनी मोठ्या मायेने अर्पण केले आहे.

 मुंबईतल्या गिरण्यांच्या गराड्यात वसलेल्या गिरणगाव परिसरातील मंगलदास चाळीत तळेकर आडनाच्या एका गिरणी कामगार दांपत्याच्या पोटी कृष्णाबाईंचा जन्म झाला आणि वर्षाच्या आतच वडील वारले. त्यानंतर पाच सहा महिन्यांत आईने माहेरी जाऊन आत्महत्या केली. तेव्हा कृष्णाबाई दीड वर्षांच्या होत्या. कृष्णाबाईंना चार चुलते, एक आत्या होती. दोन्हीकडच्या आज्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील एक गाव हे कृष्णाबाईंच्या आईचे माहेर. आई वारल्यानंतर आजोळी जाण्याचा प्रश्नच नव्हता. कृष्णाबाईंचे बालपण आजीच्या देखरेखीखाली मुंबईतल्या गिरणगावात  कडक शिस्तीत गेले. कृष्णाबाईंची आजी म्हणजे खानदानी मराठा जात समूहातील एक धिरोदात्त बाई. चारही मुलांना गिरण्यांच्या कामावर लावून स्वतः खानावळ चालवणारी चाळ मालकिण. तिच्याच चाळीत खालच्या मजल्यावर गंगाराम सुर्वे भाडेकरू म्हणून राहात होते.

आईवडिलांविना पोरकी पोर म्हणून आजीचा कृष्णाबाईंवर विशेष जीव होता. आपल्या नंतर कृष्णाचे कसे होईल, याची नेहमीच आजीला चिंता लागायची. दरम्यान गंगाराम सुर्वे यांनी सांभाळलेल्या नारायणाची आणि कृष्णाची ओळख होते. नारायण हा लहानपणापासून गिरणीत काम करायचा आणि कामगार चळवळीतही. कृष्णाबाईंचे एक  चुलतेही काॅम्रेड होते. त्यामुळे नारायणचे त्यांच्या घरी जाणे येणे होते. अनेक कडू गोड प्रसंगातून कृष्णा आणि नारायण हे एकमेकांची काळजी घेतात, कारण दोघेही तसे अनाथच. हा पोरकेपणाचा समान धागा दोघांना एकत्र आणतो. त्यांच्यात प्रेमाचा अंकूर फुलवतो. पुढे अचानक कृष्णाची आजी मरण पावते आणि कृष्णा पुन्हा पोरकी होते. चुलते तिला धाकात ठेवून राब राब राबवून घेतात. तेव्हा ती स्वतःच नारायणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेते.

मात्र ज्याची जात पात माहीत नाही अशा अनाथ मुलाला आम्ही मुलगी देणार नाही, असा निर्धार तिचे चुलते करतात. उलट नारायणला खतम करण्याची धमकी देतात, हे पाहून गंगाराम सुर्वे मुंबई सोडून रातोरात आपले गाव गाठतात. तेव्हा एकाकी पडलेल्या नारायणासोबत पळून जाऊन कृष्णा कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न करते. घर ना दार. लग्न झाल्यावर राहायचे कुठे? खायचे काय? अशा अडचणीच्या काळात चळवळीतले मित्र, कॉम्रेडस धाऊन येतात. पण मित्र तरी किती दिवस सहारा देणार? शेवटी हे जोडपं फुटपाथवर मुक्काम करत कसेतरी दिवस काढते. दरम्यान घरादाराचा पत्ता नसतानाही कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत काम करत असतानाच नारायण सुर्वे हे कविताही लिहू लागतात आणि मोर्चे, संप, आंदोलनात उतरून भाषणेही करु लागतात. त्यातूनच त्यांची ओळख शिक्षण अधिकारी कपिला खांडवाला मॅडमशी होते. त्याही पूर्वी कम्युनिस्ट कार्यकर्त्या होत्या. खांडवाला मॅडमच्या ओळखीने नारायण सुर्वे यांना मुंबई म्युनिसिपल कौन्सिलच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळते. दरम्यान पहिल्या मुलाचा रविचा जन्मही झालेला असतो. नारायण सुर्वे स्वतःला झोकून देऊन चळवळीत काम करत होते तेव्हा संसाराचा गाडा कृष्णाबाई एकट्याने हिंमतीने ओढत होत्या.

शिपायाची नोकरी लागली तेव्हा सुर्वे तिसरी पास होते. कृष्णाबाईंच्या आग्रहावरून त्यांनी मोठा मुलगा रवि बरोबर सातवीची परीक्षा दिली आणि सातवी उत्तीर्ण होऊन, शिक्षक ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून, ज्या शाळेत शिपाई होते, तिथेच शिक्षक म्हणून रुजू झाले. खांडवाला मॅडमच्या सहकार्यामुळे १९५० साली कृष्णाबाईंचीही शाळेत शिपाई म्हणून नियुक्ती झाली. शोषणाविरुद्ध अविरत लढणाऱ्या कार्यकर्त्या कविचा संसार सुखाचा करण्यातच कृष्णाबाईंची अख्खी हयात गेली. पण त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही. 'मास्तरांची सावली'  बनूनच त्या अखेरपर्यंत राहिल्या. नकोसे मूलं म्हणून कचराकुंडीत फेकलेल्या, फूटपाथवर दिवस काढलेल्या या कविला पुढे अनेक मान सन्मान मिळाले. मात्र सुर्व्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी कृष्णाबाईंना स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र विकावे लागले होते. आपल्या कलावंत पतीला कृष्णाबाईंनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.

कवितेने नारायण सुर्वे यांना जगभर प्रसिद्ध केले. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासह भारत सरकारकडून पद्मश्री हा किताबही मिळाला. सरकार तर्फे ते सन्मानपूर्वक रशियाला गेले. साहित्य अकादमीसह अनेक शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. १९९५ साली परभणी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. कचराकुंडीपासून ते थेट रशियाच्या माॅस्कोपर्यंतचा हा उर्ध्वगामी प्रवास थक्क करणारा आहे. मात्र खरे जीवन काय नि कसे असते, हे शिकवणाराही हाच प्रवास आहे.

कृष्णाबाईंनी आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच कथन केलेला हा त्यांचा आणि कविवर्य नारायण सुर्वे यांचा सहजीवनप्रवास वाचकांना खूप काही शिकवून जातो. नारायण सुर्वे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषणमुक्त, समतावादी समाजासाठी चळवळीला समर्पित केले. मात्र पोटच्या मुलांकडे त्यांना लक्ष देता आले नाही किंवा जिंदगीच्या रहाटगाडग्यात त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे दोन्ही मुले हातातून निसटली. एक व्यसनात बुडाला तर दुसरा ऐन तारुण्यात जग सोडून गेला. दोन्ही मुली आपापल्या संसारात यशस्वी झाल्या; मात्र कुणीही  आपला वारसा चालवू शकले नाही, ही खंत राहिलीच.

नाशिकचे पत्रकार उत्तम कांबळे यांनी पुढाकार घेऊन नाशिक येथे कविवर्य सुर्वे हयात असतानाच त्यांच्या नावाने भव्य असे" कविवर्य नारायण सुर्वे सांस्कृतिक भवन आणि वाचनालय" उभारले. दरम्यान कौटुंबिक आघातांनी खचलेल्या, आतल्या आत पोखरलेल्या  कविवर्यांना डायबेटिससह  र्‍हदयविकार जडला. बायपास सर्जरी करावी लागली. मात्र थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. लया दोघांनी मिळून अनेक भोग भोगले. अनेक आघात सोसले. मात्र नियतीपुढे कधीच गुडघे टेकले नाही. हार न मानता समाजसाठी सतत लढणारे हे दोघे पती-पत्नी म्हणजे सच्चे काॅम्रेडच. आपल्या मनातील गुज अगदी जवळच्या माणसाला बोलून दाखवावे, मन हलके करावे, तसे कृष्णाबाई सांगत जातात.

हळूहळू मोकळ्या होत जातात. वाचकाला सहजपणे आपलंसं करतात. ही एका महाकविच्या जीवनाची गाथा आहे. ती कृष्णाबाईंच्या कथनातून उलगडत जाते. कवी म्हणून नारायण सुर्वे जगाला माहीत आहेत. त्यांनी काय लिहिले, हे सर्वज्ञात आहे; मात्र ते कसे जगले याचा शोध कृष्णाबाईंनी "मास्तरांची सावली" मधून घेतला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुस्तकात एक गोष्ट सतत घडत जाते ती म्हणजे स्थलांतर! एका जागी कुठेही न थांबणं हा कृष्णाबाई आणि नारायण सुर्वे यांचा स्थायीभावच. अगदी जन्मापासून हे स्थलांतर पिच्छा सोडत नाही.

२००५ मध्ये दोघेही अंधेरीतील चांगले सुस्थितीतील घर सोडून हवेशीर ठिकाणी राहायचे म्हणून निसर्गरम्य माथेरान जवळच्या नेरळला राहायला येतात. येतानाच अंधेरीहूनच एक ट्रक भरून ट्रॅाफिज, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तकं अशी आयुष्यभराची कमाई नाशिकला पाठवून देतात. असा त्याग फक्त नारायण सुर्वे आणि कृष्णाबाईच करु शकतात. एका काॅम्रेड कवीची ही संघर्ष गाथा म्हणजे महान जीवनमूल्यांची मौल्यवान ठेव आहे. एका दमात वाचून काढावी अशीच ही कलाकृती मराठी स्वकथनाचे दालन समृद्ध करणारी नक्कीच आहे.

"मास्तरांची सावली", कृष्णाबाई नारायण सुर्वे (शब्दांकन
-नेहा किशोर सावंत), डिंपल पब्लिकेशन, १०४, वायकिकी अपार्टमेंट, नवघर वसई रोड स्टेशन (प.रेल्वे) जि. ठाणे - ४०१ २०२, प्रथमावृत्ती : १५ ऑगस्ट २००९, पृष्ठे : १८४, मूल्य : १८० रुपये.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News