...तरच विवाह नोंदणी करता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • मिरज पंचायत समितीची नवदांपत्यांना अट

मिरज - प्रत्येक नवदांपत्याने एक झाड लावले तरच विवाहाची नोंदणी करावी, असा ठराव पंचायत समितीने केला. उपसभापती विक्रम पाटील यांनी तो मांडला. ते म्हणाले, की वृक्षतोडीमुळे राज्याला सध्या तीव्र दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. झाडे लावण्यासाठी शासन मोहीम राबवत असले तरी त्यात नागरिकांचाही सक्रिय सहभाग हवा. प्रबोधनाने वृक्षलागवड होईलच; पण काही प्रमाणात सक्तीचीही गरज आहे.

त्यानुसार पंचायत समितीमार्फत उपाययोजना राबवायला हव्यात. पहिल्या टप्प्यात नवदांपत्याला वृक्षलागवडीची सक्ती करावी. लग्नानंतर त्यांनी किमान एक झाड लावावे. काही दिवस सांभाळ करावा. त्यानंतरच त्यांच्या विवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जावी. असा उपक्रम राबवणारी मिरज पंचायत समिती राज्यात पहिली ठरेल. 

या ठरावाला सदस्य अशोक मोहिते, कृष्णदेव कांबळे, अनिल आमटवणे, काकासाहेब धामणे यांनी अनुमोदन दिले. पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचाही वापर करण्याची सूचना श्री. पाटील यांनी केली. तालुक्‍यात सर्व सरकारी इमारतींत पावसाचे पाणी साठवण्याची तसेच कूपनलिकांत पुनर्भरण करण्याची यंत्रणा राबवावी, असे ते म्हणाले. यासाठी विविध शासकीय निधीचा वापर केला जावा. गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांनी त्याला पाठिंबा देत सांगितले, की पहिल्या टप्प्यात पंचायत समितीत हा प्रयोग करू.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News