पाच वर्षांत होणार राज्यात मेरिटाईम विद्यापीठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

राज्यातील ‘मेरिटाईम’ व्यवसायाच्या विकासासाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

मुंबई - पुढील पाच वर्षांत सरकारच्या माध्यमातून राज्यात मेरिटाईम विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्धार महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनने केला आहे. राज्यातील सागरी (मरिन) व्यवसायाला चालना देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याचा संकल्प नुकताच असोसिएशनच्या पाचव्या वर्धापनदिन समारंभात सोडण्यात आला.

राज्यातील ‘मेरिटाईम’ व्यवसायाच्या विकासासाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. संघटनेचा पाचवा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. महाराष्ट्राला तब्बल ७५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असूनही ‘मेरिटाईम’ व्यवसायाचा फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे ‘मेरिटाईम’ व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारच्या सहकार्याने सर्वंकष धोरण राबवण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासंदर्भात पुढील पाच वर्षांसाठीचे संकल्पचित्र सादर करण्यात आले.

त्यानुसार राज्यात पाच वर्षांत ‘मेरिटाईम’ विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल. असोसिएशनचे अध्यक्ष केदार चौधरी, उपाध्यक्ष स्वानंद पाटणकर, हर्षद पटवर्धन, नितीनी बोंद्रे, आशुतोष अपांडकर, डॉ. जयश्री फडणवीस, गजानन करंजीकर आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश अभ्यंकर, सुरेश दिवेकर, पुरुषोत्तम बर्वे, सुधीर नाफडे, गिरीश फडणीस, संदीप शिवानी आदी उपस्थित होते.
 

जलमार्गाचा संकल्प
सागरी आर्थिक क्षेत्र (मेरिटाईम इकॉनॉमिक झोन), किनारी जहाजवाहतूक (कोस्टल शिपिंग), इंडिया मेरिटाईम सर्व्हिसेस आणि अंतर्गत जलमार्ग तयार करण्याचा संकल्प सोडण्यात आला. भारताला सागरी व्यापाराच्या नकाशावर आघाडीचे स्थान मिळवून देणे शक्‍य आहे, असे मत नॅशनल शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News