मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये झपाट्याने वाढ

काजल डांगे
Saturday, 22 June 2019

अभिनेत्री गौरी नलावडे आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘अधम’ चित्रपटाच्या टीमने ‘सकाळ संवाद’मध्ये अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. या वेळी ‘अधम’ चित्रपटाबरोबर आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील इतर महत्त्वाच्या विषयांबाबत थेट मतं मांडली गेली.  
 

सध्या मराठी चित्रपटांच्या निर्मिती संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये निर्मिती क्षेत्रामध्ये उतरलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कर्पोरेट कंपन्यांमुळे कुठेतरी स्वतंत्र्यपणे चित्रपट घेऊन येणारा निर्माता मागे पडत चालला आहे, हेदेखील तितकेच खरे आहे. याचबाबत अभिनेता संतोष जुवेकरने त्याचे मत व्यक्त केले. संतोष म्हणतो, ‘मराठी चित्रपटांची निर्मिती वाढत चालली आहे ही चांगलीच बाब आहे. इरॉस, व्हायकॉमसारख्या मोठ्या कंपन्या निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. या कंपन्यांची खासियत म्हणजे त्यांच्या चित्रपटांचे मार्केटिंग. यामुळे अधिकाधिक प्रेक्षक कॉर्पोरेट कंपन्यांच्या चित्रपटांकडे वळतो. शिवाय मनोरंजनक्षेत्रात या कॉर्पोरेट कंपन्यांनी याधीच आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे एका विशिष्ट कंपनीचा चित्रपट म्हटला, की प्रेक्षक त्याकडे हमखास वळतो. या सगळ्यामध्ये स्वतंत्र्यपणे चित्रपट बनवणारा निर्माता नक्कीच मागे पडला आहे. पण कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर स्वतंत्र निर्माताही उत्तम कथा घेऊन येत आहे. 

संतोषचा आगामी ‘अधम’ चित्रपटही कोणत्याच कॉर्पोरेट कंपनीचा नसून तुषार खांडगे आणि सचिन खांडगे या स्वतंत्र निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री गौरी नलावडेही मुख्य भूमिकेत आहे. स्वतंत्रपणे निर्मितीक्षेत्रात उतरणारे तुषार सांगतात, ‘चित्रपटाची कथा, मांडणी उत्तम असेल तर त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. तुम्ही कोणती स्टारकास्ट आणि कथा घेऊन येता हे महत्त्वाचे आहे. माझे कोणत्याही कॉर्पोरेट कंपन्यांशी संबंध नाहीत. पण माझा हा चित्रपट उत्तम असेल तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’ 

खरंतर कॉर्पोरेट कंपन्यांचा निर्मितीक्षेत्रामध्ये जरी दबदबा असला तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट स्वतंत्र निर्मात्याने बनवलेला चित्रपट होता आणि हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर उचलूनही धरला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या चित्रपटात नेमकं काय आहे, हे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला, तर सिनेरसिक चित्रपट पहायला नक्कीच येतील, अशी मतं टीम ‘अधम’ने व्यक्त केलीत. 

मराठी चित्रपटांचा दर्जा हळूहळू उंचावत आहे. त्याचबरोबरीने हिंदी चित्रपटांकडे पाहिलं, तर त्याचा आर्थिक विस्तार, निर्मिती संख्या, बॉक्‍स ऑफिसवरील कलेक्‍शन मोठ्या प्रमाणात आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, त्यांचे चित्रपट आणि आपले चित्रपट यामध्ये खूप मोठी दरी आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपट कमर्शिअल हिट्‌स असतात. याचबाबत दिग्दर्शक अभिषेक केळकर म्हणतात, ‘साऊथमध्ये मुळातच चित्रपट पाहण्याचे कल्चर आहे. पण आपल्याकडे चित्र उलट आहे. महाराष्ट्रामध्ये चित्रपट कमी पण नाटक पाहण्याचे कल्चर आहे. मालिकाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पाहतात.’ 

साऊथ चित्रपट म्हटला, की सुपरहिट गाणं, दमदार ॲक्‍शन सीन्स म्हणजेच त्यांचा हिरो ‘लार्जर दॅन लाईफ’च असतो. पण आपल्याकडे अशाप्रकारचा चित्रपट बनवला, की तो प्रेक्षकांना पचणारच नाही. आपला हिरो दमदार दिसलाच नाही आणि दिसला तर तो चालला नाही, असे संतोषचे मत आहे; तर गौरी म्हणते, ‘साऊथकडचे प्रेक्षक फार प्रामाणिक आहेत. ते कलाकारांना देव मानतात. ते प्रत्येक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघणारच. आपल्याकडचा प्रेक्षकही कलाकारांप्रती प्रेम दाखवतो. पण साऊथमध्ये चित्रपट, कलाकारांच्याबाबतीत फार चांगलं चित्र पाहायला मिळतं.’

अभिषेक केळकर दिग्दर्शित आणि तुषार-सचिन खांडगे निर्मित ‘अधम’ चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. पुण्याजवळील दगडखाणी आणि त्यांचे बेकायदेशीर सुरू असलेले खोदकाम, त्याचा निसर्गावर होणारा परिणाम यावर ‘अधम’ चित्रपट आधारित आहे. गौरी नलावडे या चित्रपटात नंदिनी तर संतोष जुवेकर विकी हे पात्र साकारत आहे. एका गावातील अनाथ मुलगा नंदिनीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याला अनेक गोष्टी उलगडतात. बेकायदेशीर खोदकाम थांबवण्यासाठी विकीची चाललेली धडपड दाखवण्यात येणार आहे. ‘अधम’च्या निमित्ताने एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळाल्याचे  गौरी आणि संतोषने सांगितले.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News