श्रेयसचा मनोरंजन दुनियेतला प्रवास

स्नेहा गावकर
Saturday, 3 August 2019

मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. श्रेयस इथवरच थांबला नाही; तर त्याने हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम काम करत बॉलीवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लायन किंग’ या चित्रपटामधील टिमॉन या पात्रालाही त्याने आवाज दिला, त्यानिमित्त त्याचा मनोरंजन दुनियेतला प्रवास... 

‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘अवंतिका’ यासारख्या मराठी मालिका मी केल्या. या मालिका प्रचंड गाजल्या. शिवाय ‘माय नेम इज लखन’ ही हिंदी मालिका हल्लीच केली. २०१५ मध्ये ‘बाजी’ हा शेवटचा मराठी चित्रपट केला. त्यानंतर मराठी चित्रपटात दिसलोच नाही म्हणून बऱ्याच चाहत्यांनी तक्रारदेखील केली. मराठी नाटकांनी, चित्रपटांनी या क्षेत्रात मला उभं केलंय. त्यामुळे माझा असा अजिबात हेतू नाही, की मराठी चित्रपटसृष्टीत काम करायचं नाही. त्यामुळे मी वर्षातून एक तरी मराठी चित्रपट करण्याचं ठरवलं. या वर्षाअखेरीस मी चित्रीकरणाला सुरुवात करतोय. तो चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळलो आहे, कदाचित त्यामुळे अभिनयाकडे थोडं दुर्लक्षच केलं. मात्र मी लवकरच नव्या भूमिकेतून लवकरच प्रेक्षकांसमोर येईन. 

बजेट ही एक गोष्ट सोडली तर बाकी असा काही जास्त फरक हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत जाणवत नाही. हिंदीचे मार्केट मोठे आहे. त्यामुळे बजेट जास्त असते. मराठीचे मार्केट ‘सैराट’ चित्रपटापूर्वी मर्यादित होते. त्यानंतर गणितच बदललं. आता मराठी निर्मातेही धोका पत्करून चित्रपटनिर्मिती करत आहेत. जेवढी मेहनत हिंदी चित्रपटात काम करताना लागते त्याहून जास्त मेहनत मराठी चित्रपटांमध्ये काम करताना लागते. याचं कारण चित्रीकरणाच्या वेळी तांत्रिकदृष्ट्या सेटवर कमी साधनं उपलब्ध असताना जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांना प्रयत्न जास्त करावे लागतात, त्यासाठी मराठी कलाकार कुठेही मागे पडत नाहीत. 

मला भाषेचं कुंपण बनून जगायला कधीच आवडणार नाही. नवीन आव्हानांचा सामना करायला नक्कीच आवडेल, मग ती नवी भाषा असो की नवे लोक. मी माझ्या कामातून प्रेक्षकांना शंभर टक्के मनोरंजन देण्याचा प्रयत्न करीन. 
नुकताच ‘द लायन किंग’ चित्रपटात मी ‘टिमॉन’ या पात्रासाठी आवाज दिला आहे. हा अनुभव माझ्यासाठी फारच वेगळा होता. टिमॉन हे पात्र खूप छान रेखाटण्यात आलं आहे. एक गोड, निर्मळ मनाचं असं काहीसं ते पात्र आहे.

त्यामुळे मला ही भूमिका करताना खूप मज्जा आली. खूप अडचणींचा सामना करावा लागला. परंतु जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून निघून काहीतरी वेगळे करतो, तेव्हा या अडचणीही सहज दूर होतात. यात एक योगायोगदेखील जुळून आला, या चित्रपटात मी शाहरूख खानचा मुलगा आर्यनच्या मित्राच्या भूमिकेत आहे; तर १२ वर्षांआधी मी शाहरूखच्या मित्राची भूमिका साकारलेली. मागे वळून पाहिलं तर खरंच ही गोष्ट गमतीशीर वाटते. या चित्रपटाचा अनुभव अविस्मरणीय आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News