‘आयसीएस, सीबीएससी’त मराठीची सक्ती करण्यता येणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • अन्यथा मान्यता होणार रद्द; मराठी शिक्षण कायद्याच्या मसुद्यात तरतूद

मुंबई - सीबीएससी, आयसीएस तसेच अन्य बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या शाळांना मान्यता (ना-हरकत प्रमाणपत्र) देतानाच ही अट घालण्यात येईल. या अटीचे पालन न केल्यास या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी तरतूद मराठी शिक्षण कायद्यासाठी तयार केलेल्या मसुद्यामध्ये केली आहे.

‘मराठीच्या भल्यासाठी’ व्यासपीठाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घेत विधिज्ञाच्या मदतीने कायद्याचा मसुदा तयार केला. त्यावर पुणे येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. त्यानंतर या कायद्याच्या मसुद्यावर अंतिम मोहोर लावण्यात आली.

मराठी विषय २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून, तर २०२१-२०२२ पासून इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुरवात करून टप्प्याटप्प्याने मराठी विषय पहिली ते बारावीपर्यंत शिकवण्यात येईल. प्रत्येक शाळेत मराठीच्या अध्ययनासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या पाठ्यपुस्तकांचा वापर केला जाईल. अनिवार्य मराठी भाषा अध्ययन ही महाराष्ट्र शिक्षण अधिनियम व नियम यांच्या तरतुदीनुसार बिगर-अनुदानप्राप्त शाळांना मान्यता देण्याची एक अट करण्यात येईल. मराठी भाषा शिकविण्याच्या आवश्‍यक सुविधा केवळ भाषिक अल्पसंख्याक शाळांमध्ये पुरविण्यात येईल. मराठीमध्ये उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल, असेही मसुद्यामध्ये नमूद केले आहे.

या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकाऱ्याची अधिसूचनेद्वारे सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येईल. सक्षम प्राधिकाऱ्यांवर शिक्षण उपसंचालकांच्या समकक्ष अपिलीय अधिकारी नेमण्यात येईल. या अधिकाऱ्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाविरुद्ध ३० दिवसांच्या आत अपील करता येईल. या नियमांचे उल्लंघन केल्यास शाळेला दंड आणि तीनपेक्षा जास्तवेळा नियमांचे उल्लंघन केल्यास मान्यता (ना-हरकत प्रमाणपत्र) रद्द करणाच्या शिफारशीसह राज्य सरकारास सादर करतील. ९० दिवसांच्या आत राज्य सरकार संबंधित शाळेची चौकशी करून योग्य कारवाई करेल, अशी तरतूद मराठी शिक्षण कायद्याच्या मसुद्यामध्ये केली आहे.

अभिप्राय कळविण्याचे आवाहन
राज्यातील सर्व शाळा, मराठी अभ्यासक, मराठी संस्थांनी या मसुद्यावर आपले अभिप्राय, हरकती पाठविण्याचे आवाहन ‘मराठी भल्यासाठी’ व्यासपीठाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. आपल्या हरकती, अभिप्राय masapapune.org या संकेतस्थळावर नोंदवाव्यात किंवा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्हॉट्‌सॲप क्रमांक ९३२५२९७५०९ वर १५ ऑगस्टपर्यंत पाठवाव्यात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News