नवीन बनावट नोटांची हेराफेरी; 2 युवकांना अटक- 39 हजार जप्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

मलकापूर: मलकापूर शहरात नकली नोटांची हेराफेरी होणार असल्याची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचून बुधवारी (ता. 17) संध्याकाळी 7 दरम्यान जळगाव खानदेश जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नवीन चलनातील 39 हजारांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहे. 

मलकापूर: मलकापूर शहरात नकली नोटांची हेराफेरी होणार असल्याची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तत्काळ सापळा रचून बुधवारी (ता. 17) संध्याकाळी 7 दरम्यान जळगाव खानदेश जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नवीन चलनातील 39 हजारांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरसह परिसरात काही व्यक्ती नकली नोटांची हेराफेरी करणार असल्याची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पीएसआय इम्रान इनामदार यांना मिळाली. यावर त्यांनी तत्काळ सापळा रचत शहरातील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ काही व्यक्ती येणार असल्याची माहितीची खातरजमा केली. यावेळी घटनास्थळी नकली नोटा घेणे व देणे होणार असल्याचे स्पष्ट झाले. यावर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात  पीएसआय इमरान इनामदार, कांस्टेबल प्रकाश राठोड, संदीप मोरे, नदीम शेख तथा चालक भरत राजपूत यांनी संध्याकाळी 7 दरम्यान वानखेड़े पेट्रोल पंपाजवळ साध्या गणवेशातील पोलिस कर्मचाऱ्यांचा सापळा लावला. 

यादरम्यान, आरोपी शेख अलीम शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अन्ना (वय 40) व आमिर सोहेल शेख रिसालुद्दीन उर्फ राजू (वय 25) यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते जळगाव खानदेश जिल्ह्यातील बोदवड येथील असल्याचे समोर आले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांना 
सध्या चलनातील नवीन 200 रुपयांच्या 173 नोटा, 100 रुपयांच्या 50 नोटा असे एकूण 39 हजारांच्या भारतीय चलानात असलेल्या बनावट नोटा तसेच दोन दुचाकी (किंमत 50 हजार) असा एकूण 89 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघाविरोधात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांपुढे आव्हान
पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून सध्या चालनात असलेल्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्या नोटा कुठून आल्या, कुठे वापर केला का, यापूर्वी हेराफेरीसह यामागे कुठले मोठे रॅकेट तर नाही ना याचा तपास करून, तत्काळ कार्यवाही करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, नागरिकांनी नवीन नोटा वापरत असताना खात्री करूनच त्या वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News