माणसा-माणसातील नाळ जोडण्यांच काम वारी करते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

वारकरी विचारांनी प्रभावित असलेल्या महादजी शिंदेंसारख्या राज्यकर्त्याने वारकरी भजन आणि त्यातील विचार जपण्याचा प्रयत्न केला.

पुणे - वारकरी विचारांनी प्रभावित असलेल्या महादजी शिंदेंसारख्या राज्यकर्त्याने वारकरी भजन आणि त्यातील विचार जपण्याचा प्रयत्न केला. आजही वारीमध्ये कोणालाही जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर प्रवेश नाकारला जात नाही. आजच्या काळात महाराष्ट्रात जी सलोख्याची वीण दिसते, ती वारकरी संप्रदायाच्या लोकांनी विणली आहे, असे आपण निश्‍चितपणे म्हणू शकतो, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. सकाळ माध्यम समूहाच्या विठाई या आषाढी वारी विशेषांकासाठी त्यांनी विशेष मुलाखत दिली. 

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘माणसा-माणसातील अंतर कमी करणे. हाच संतांचा संदेश होता. त्यामुळे आपण वापरलेला शब्द ‘सलोख्याची वारी’ महाराष्ट्रात काही शतके टिकून आहे. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडे महाराष्ट्र हा अल्लाउद्दीन खिल्जीकडे जाण्यापूर्वीच समाधिस्थ झाली होती. नामदेवांच्या गुरुग्रंथ साहिबामधील पदे पाहिलीत तर असे लक्षात येईल, की त्यांनी दोन विरोधी दिसणाऱ्या धारांमध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली, की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष होता कामा नये. त्यादृष्टीने एकनाथांचे ‘हिंदू-तुर्क संवाद’ हे भारूड खूप महत्त्वाचे आहे.’’  

ते पुढे म्हणाले, ‘‘शेख महंमद बाबा आणि तुकाराम महाराज यांचे जवळचे संबंध होते. ‘ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचा शेखा.’ अशी परंपरा आहे. म्हणजे तुकोबांना कबीर महत्त्वाचे वाटणे, त्यांना तुकोबांनी गुरुस्थानी मानणे, हे बरेच काही सांगून जाते. देहूची हद्द सोडल्यानंतर पहिल्यांदा तुकोबांची पालखी थांबते आणि पहिली आरती होते, ती देहूबाहेरच्या अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर. हे सलोख्याचेच द्योतक आहे. ‘सकाळ’च्या सलोख्याची वारी या उपक्रमाबद्दलही या वेळी त्यांनी कौतुकोद्गार काढले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News